Illegal Liquor Raid Uran: चाणजेच्या जंगलात गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त; पिंपरी, चिंचवडातील दारुकांडानंतर गुन्हे शाखेचा छापा

Illegal Liquor Raid Uran
Illegal Liquor Raid UranPudhari
Published on
Updated on

उरण: पिंपरी-चिंचवड येथे बनावट आणि विषारी दारूमुळे 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या भीषण दारूकांडानंतर अखेर नवीमुंबई पोलिसांना जाग आली असून, अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-2 ने उरण तालुक्यातील चाणजे गावाजवळील जंगल आणि शेत परिसरामध्ये धडक कारवाई करत गावठी हातभट्टीचे दोन मोठे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी हजारो लिटर्स कच्चे रसायन जागीच नष्ट केले असून एका 62 वर्षीय वृद्धाला ताब्यात घेतले आहे.

Illegal Liquor Raid Uran
Konkan Water Crisis: चिंताजनक! कोकणातील धरणे तळ गाठू लागली

गुन्हे शाखा कक्ष-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चाणजे गावालगतच्या जंगल परिसरात रवी दामोदर म्हात्रे हा बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने झाडी-झुडुपांचा आडोसा घेत चाणजे येथील रवी म्हात्रे यांच्या मालकीच्या जागेवर छापा टाकला. तेथे हिरामण काशिनाथ म्हात्रे हा इसम मोठ्या स्टोव्हवर भांडी लावून सडलेल्या काळ्या गुळाच्या द्रावणापासून गावठी दारू गाळताना रंगेहात पकडला गेला.

या कारवाईनंतर पोलिसांनी पंचांसमक्ष हिरामण म्हात्रे याची कसून चौकशी केली असता, त्याने अवघ्या 25 ते 50 मीटर अंतरावर ताडाच्या पानाच्या झोपडीत अनिल म्हात्रे याच्या मालकीचा दुसरा दारूचा अड्डा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणीही दुसरी मोठी कारवाई केली.

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी रवी म्हात्रे यांच्या जागेतून 200 लिटर क्षमतेचे 8 प्लास्टिक ड्रम (ज्यात गूळ आणि पाण्याचे सुमारे 1600 लिटर सडलेले मिश्रण होते), लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन, ॲल्युमिनियमची टाकी व पातेली असा एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Illegal Liquor Raid Uran
Raigad Politics: गोगावले पालकमंत्री,अनिकेत तटकरे आमदार; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत दिलजमाई

अनिल म्हात्रे यांच्या झोपडीतून 200 लिटर क्षमतेचे 7 प्लास्टिक ड्रम (1400 लिटर रसायन), स्टोव्ह व इतर साहित्यासह 27,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टीसाठी तयार केलेले हे कच्चे रसायन वाहतुकीस अवजड असल्याने पोलिसांनी एकूण 15 ड्रममधील रसायन जागीच शेतात ओतून नष्ट केले आणि ड्रमची मोडतोड केली. रासायनिक विश्लेषणासाठी दारूचे नमुने काचेच्या बाटल्यांमध्ये सील करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेला आरोपी हिरामण काशिनाथ म्हात्रे (वय 62, रा. करंजा) हा केवळ पगारी कामगार असून तो रवी दामोदर म्हात्रे आणि अनिल म्हात्रे (दोघे रा. करंजा) यांच्या सांगण्यावरून व त्यांच्यासाठी या दारूच्या भट्ट्या चालवत होता. हे दोघे मुख्य मालक उरण आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर या गावठी दारूची विक्री करत होते.

उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तुकाराम खांडवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील घटनेनंतर उरण परिसरात अशा प्रकारे गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news