गावदेवी मंडईत भाजीविक्रेत्यावर हल्ला pudhari photo
ठाणे

Thane Crime : गावदेवी मंडईत भाजीविक्रेत्यावर हल्ला

भाजीविक्रेता जखमी; बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : महापालिकेच्या गावदेवी मंडईत काही समाजकंटकांमुळे दहशत पसरली असून, एका समाजकंटकाने भाजी विक्रेत्यावर सोमवारी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात भाजी विक्रेता जखमी झाला आहे. या प्रकाराने विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी आरोपीविरोधात व प्रवेशद्वार बळकावणाऱ्या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गावदेवी भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर बेकायदा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मंडईत ये-जा करणाऱ्या ग्राहकांनी तक्रार केल्यास, बेकायदा विक्रेत्यांकडून ग्राहकांना शिविगाळ केली जाते. त्यातील एक विक्रेता नवनाथ वायकर याच्या आईचे मंडईत गाळे आहेत. मात्र, त्याच्याकडून व त्याच्या काही साथीदारांकडून प्रवेशद्वारालगत दुकाने उभारून अधिकृत भाजी विक्रेत्यांवर दादागिरी केली जात आहे. तसेच अनेक गाळेधारकांना मारहाणही करण्यात आली, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.

गावदेवी मार्केटमध्ये किशोर नऱ्हे यांचे तीन गाळे आहेत. तर मार्केटमध्येच नवनाथ वायकर याच्या आईच्या नावावरील तीन गाळे आहेत. त्याच्याबरोबर अनेक गाळेधारकांचे सातत्याने वाद होत आहेत. मार्केटमधील एक जादा गाळा किशोर नऱ्हे यांच्या नावावर आहे. त्याच्या ताब्यावरून नवनाथ याच्याकडून धमक्या दिल्या जात होत्या. मार्केटमध्ये दिसल्यास जिवंत सोडणार नाही, अशी त्याने धमकी दिली होती, असे किशोर नऱ्हे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

गावदेवी मंदिराबाहेरील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्ताने गाळेधारकांकडून बुधवारी वर्गणी जमा केली जात होती. त्यावेळी नवनाथ याने किशोर नऱ्हे याच्यावर शहाळे सोलण्याच्या सुऱ्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. नवनाथ याने गाळेधारक अलका काजळे व प्रमिला कोल्हे यांनाही शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पंकज काजळे यांनाही मारहाण केली.

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावदेवी भाजी मंडईमध्ये घबराट पसरली आहे. गावदेवी मंडईतील मूळ विक्रेते हे बेकायदा विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे हैराण झाले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT