ठाणे

डोंबिवलीतील दुकानदाराचे अपहरण करणारी टोळी जेरबंद

अविनाश सुतार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : दुकानात ग्राहक बनून आलेल्या इसमाने एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगून दुकानदाराला आपल्या सोबत नेत त्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना डोंबिवली पूर्व येथे घडली. मात्र, मानपाडा पोलिसांना शिताफीने या दुकानदाराला अपहरण कर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यात यश आले आहे. दरम्यान, बेरोजगार असणाऱ्या या आरोपींनी झटापट पैसे कमवायचे उद्देशाने हे अपहरण केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

डोंबिवली पूर्व येथे राहणारे संजय रामकिशन विश्वकर्मा (३९), संदीप ज्ञानदेव रोकडे (३९), धर्मराज अंबादास कांबळे (३६), रोशन गणपत सावंत ( ४०) या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ३२ हजार रुपयांची झायलो कार आणि ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीलॅक्स प्लायवूड नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक हिम्मत नाहर ३ ऑगस्टरोजी त्यांच्या दुकानात बसले होते. यावेळी आरोपी संजय विश्वकर्मा यांनी जुन्या ओळखीने त्यांच्या दुकानात येऊन ३ लाख रुपयांचे प्लायवूड खरेदी करण्याचा व्यवहार केला. व व्यवहाराचे अॅडव्हान्स पैसे एटीएममधून काढून देण्याच्या बहाण्याने हिम्मत यांना दुकानाच्या बाहेर घेऊन गेला. यावेळी त्यांनी येथील एटीएम बंद असल्याने पुढच्या एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगून त्यांना एका गाडीमध्ये बसवले. त्यानंतर त्यांचा मोबाईल काढून घेतला व त्यांचे अपहरण केले.

त्यानंतर हिम्मत नाहर यांचा पुतण्या जितू नाहर यांच्या मोबाईलवर फोन करून तुमचा काका आमच्या ताब्यात आहे. तो परत पाहिजे असेल, तर ५० लाख रुपये द्या, असे सांगितले. त्यानंतर जितू यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर जितू यांनी पैसे देण्यासाठी आरोपींची भेट घेताच क्षणी आधी काका कुठे ते सांगा, नंतर पैसे देईन, असे सांगितले. यावेळी जितू यांच्याशी आरोपींनी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मानपाडा पोलिसांनी झायलो गाडीला घेराव घातला आणि आजूबाजूच्या खोलीत डांबून ठेवलेल्या हिम्मत नाहर यांची सुखरूप सुटका केली.

अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे , पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT