ठाणे : श्रद्धा कांदळकर
गणेशोत्सवाचा उत्साह आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून, तो सातासमुद्रापार पोहोचला आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झालेल्या मराठी नागरिकांमुळे अमेरिका, कॅनडा, जपान आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या वाढत्या मागणीमुळे यंदा ठाण्यातून तब्बल 5,000 पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.
ठाण्यातील मूर्तिकार प्रसाद वडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातील मराठी बांधव आपली संस्कृती आणि परंपरा जपत असून, त्यामुळे दरवर्षी इको-फ्रेंडली गणेशमूर्तींच्या मागणीत मोठी वाढ होत आहे.
ठाण्यातील पातलीपाडा येथे ‘गणेश कला केंद्र’ चालवणारे मूर्तिकार प्रसाद वडके गेल्या दहा वर्षांपासून परदेशात मूर्ती पाठवत आहेत. त्यांच्या मते, कोव्हिड महामारीनंतर या व्यवसायाला अधिक गती मिळाली आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांमध्ये मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे.
मूर्तिकार प्रसाद वडके यांच्या कलेची ख्याती मोठी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दरवर्षी वडके यांनी साकारलेल्या श्रींच्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठापना केली जाते.
पॅकिंग : मूर्तींना इजा होऊ नये म्हणून बबल रॅपिंग आणि मजबूत बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग केली जाते.
वाहतूक : बहुतांश मूर्ती बोटीने पाठवल्या जातात. अमेरिकेसाठी गुजरात पोर्टवरून, तर नेदरलँडसारख्या देशांसाठी जेएनपीटी पोर्टवरून मूर्ती रवाना होतात.
वेळेचे नियोजन : अमेरिकेत मूर्ती पोहोचण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे मूर्तींची बुकिंग जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच सुरू होते.
गेल्या काही वर्षांत परदेशात सार्वजनिक गणेशोत्सवाचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे आता केवळ लहान मूर्तीच नव्हे, तर अडीच फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींनाही मागणी येऊ लागली आहे. यावर्षी अमेरिकेतील सार्वजनिक मंडळांसाठी 15, तर कॅनडातील मंडळांसाठी 7 मोठ्या गणेशमूर्ती पाठवण्यात आल्याचे प्रसाद वडके यांनी सांगितले. यावरून परदेशातही गणेशोत्सव आता कौटुंबिक सोहळ्यासोबतच एक सामाजिक उत्सव बनत असल्याचे स्पष्ट होते.
कॅनडा : 2,500 मूर्ती
अमेरिका : 1,500 मूर्ती
जपान : 300 हून अधिक मूर्ती
मोठी मूर्ती : यंदाची सर्वात मोठी,
पाच फुटी मूर्ती 60 हजार रुपयांना अमेरिकेला पाठवण्यात आली आहे.