

नगर: अगदी काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगरमध्येही गणेशमूर्ती निर्मितीचा धडाका सुरू असून, गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात फिरवण्याचे काम विविध मूर्तिकार करत आहेत.
लहान मूर्तींपासून ते अतिभव्य मूर्तींपर्यंत प्रत्येक स्वरूपातील गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अहिल्यानगर परिसरातील विविध मूर्ती निर्मिती कारखान्यांमध्ये मूर्तिकार आणि कुशल कारागीर अहोरात्र परिश्रम घेत आहेत. (Latest Ahilyanagar News)
गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कायदेशीर वादामुळे मूर्तिकार आणि कारखानदारांना सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. पर्यावरणपूरक मूर्तींसाठी शासनाने नवे निकष लागू केल्यामुळे अनेक कारखान्यांचे काम थांबले होते.
परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मूर्तिकारांना उशिरा का होईना, मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी, गणेशोत्सव अगदी जवळ आलेला असतानाही मूर्तिकारांनी आशावादाने पुन्हा कामाला वेग दिला असून मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
नगर शहरातील कारखान्यांत तयार होणार्या मूर्तींना केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये - जसे की मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ‘स्वप्निल आर्ट’चे प्रमुख प्रफुल लाटणे यांनी सांगितले, की आम्ही वर्षभर मूर्तीनिर्मितीची तयारी करत असतो. मूर्तीचे डिझाईन, कलात्मक मांडणी, पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर, ग्राहकांच्या मागणीनुसार विशेष आकार व सजावट याकडे बारकाईने लक्ष देतो.
आमच्या कारखान्यात मूर्ती निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये- जसे की रंगकाम, अलंकार सजावट, नक्षीकाम, थर देणे- या सर्व प्रक्रियांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. पुरुषांप्रमाणेच त्या खांद्याला खांदा लावून काम करत असून त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य दोन्ही लक्षणीय आहे, असे त्यांनी सांगितले.
‘माधुरी’ मूर्तींना विशेष पसंती
यंदा कोल्हापूरमध्ये चर्चेत असलेल्या ‘माधुरी हत्तीणी’वर आधारित मूर्तींना विशेष पसंती मिळत आहे. या मूर्तींमध्ये गजाननाचे हत्तीणीवर बसलेले रूप भाविकांच्या मनाला भिडत आहे. तसेच पारंपरिक स्वरूपातही लालबागचा राजा, चिंतामणी, लंबोदर, सिद्धिविनायक यांसारख्या प्रसिद्ध मूर्तींच्या प्रतिकृतींचीही मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे लाटणे यांनी सांगितले.