Firte Pathak Scheme Pudhari
ठाणे

Firte Pathak Scheme: रस्त्यावर राहणाऱ्या दुर्लक्षित बालकांनाही मिळणार हक्काचे बालपण; २२ जिल्ह्यांमधील मुलांसाठी फिरते पथक

पथदर्शी प्रकल्पामुळे राज्यात ३,८०३ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ, एकट्या आणि दुर्लक्षित बालकांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने 2022 मध्ये राबविण्यात आलेल्या "फिरते पथक" या पथदर्शी प्रकल्पामुळे सुमारे 3,803 मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहे.

हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्याने राज्यातील 22 जिल्ह्यांमधील मुलांसाठी "फिरते पथक" ही योजनेचा विस्तार करण्याचा महिला व बालविकास विभागाचा मानस आहे, त्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांकडून महिला व बालविकास विभागाने प्रस्ताव मागवले आहेत.

रस्त्यावर एकट्या-दुकट्या राहणाऱ्या मुलांना भीक मागून किंवा बालमजूरी करून जीवन जगावे लागते. अनेकदा ही मुले निराधारच असतात, त्यामुळे त्यांच्यावर अत्याचारही होण्याच्या घटना घडतात, पण त्या प्रकाशात येत नाहीत, त्यामुळे अशा दुर्लक्षित मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणून त्यांना सजग करून त्यांचे बालपण आनंदी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने 2022 मध्ये "फिरते पथक" ही योजना राबविली होती.

ही योजना नाशिक, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर या महानगरांमध्ये राबविण्यात आली होती. फिरत्या वाहनांच्या माध्यमातून रस्त्यांवरील बालकांना पौष्टिक आहार, आरोग्य सेवा, शिक्षण, मनोरंजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच या बालकांची आधार नोंदणी करून त्यांना समुपदेशन, मानसिक आधार या सेवा पुरविण्यात आल्या.

या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांमध्येही शिक्षणाबाबत जनजागृती करण्यात येते. नाशिक, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर या ६ जिल्ह्यांमध्ये या योजनेचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 6 जिल्ह्यात सुमारे 3,803 मुलांना शिक्षण, आरोग्य, आहार, मनोरंजन अशा विविध सेवा पुरवण्यात आल्या असून, या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे.

म्हणूनच राज्यातील २८ महानगरपालिका क्षेत्रांसह मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा एकूण ३१ क्षेत्रांमध्ये "फिरते पथक" योजनेची अंमलबजावणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक

फिरत्या पथक योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत नोंदणी, निधी पोर्टलवरील नोंद, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल तसेच संस्थेची घटना आणि नियमावली सादर करणे आवश्यक असणार आहे. फिरत्या पथकांसाठी नियुक्त वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ट्रॅकिंग यंत्रणा असणे बंधनकारक असून ही यंत्रणा संबंधित पोलीस विभागाच्या समन्वयाने कार्यरत असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT