Fire at dyeing company in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीत डाईंग कंपनीला आग Pudhari Photo
ठाणे

डोंबिवली एमआयडीसीत डाईंग कंपनीला आग

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये मे महिन्यात झालेल्या शक्तिशाली स्फोटात अमुदान कंपनी बेचिराख झाली होती. याच कंपनी शेजारी डब्ल्यू 122 भूखंडावर असलेल्या न्यूओ ऑर्गेनिक डाईंग या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला आज (रविवार) दुपारी अचानक आग लागली. या आगीत डाईंगकरिता साठा करून ठेवलेल्या पावडरच्या पिंपांना आग लागली. तात्काळ आटोक्यात आणलेली ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा कयास आहे. आग लागताच कंपनीतल्या कामगारांनी तात्काळ बाहेर पळ काढला आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने आग तातडीने नियंत्रणात आणण्यात आली.

या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा स्फोट झाल्याच्या वावड्या काही उतावीळ नेटकऱ्यांनी समाज माध्यमांवर उडविल्या. त्यामुळे काही वेळ का होईना पण डोंबिवलीकरांच्या पोटात गोळाच आला होता. मात्र ही आग कंपनीतील स्फोटामुळे नाही तर ती शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि तातडीने ती नियंत्रणात देखिल आणल्याची माहितीही अग्निशमन दलाने दिली.

एमआयडीसी विभाग दोनमध्ये न्युओ ऑर्गेनिक डाईंग कंपनी आहे. या कंपनीच्या बाहेरील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरवर सकाळपासून दोन-तीनदा शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे कंपनीला केला जाणारा विद्युत पुरवठा कमी-जास्त होत असल्याने त्याचा परिणाम शॉर्ट सर्किटमध्ये झाला. दुपारच्या सुमारास अशाच प्रकारे ट्रान्सफॉर्मरचा जोरदार आवाज होऊन त्याचा परिणाम कंपनीतील वीज दाब अचानक वाढला. त्यामुळे कंपनीत शॉर्ट सर्किट झाले. उच्च दाबामुळे कंपनीतील वीज वाहक तारांनी तात्काळ पेट घेतला. ही आग वीज वाहिन्यांजवळ डाईंगसाठी साठा करून ठेवलेल्या पिंपांना लागताच पावडर भरलेल्या पिंपांनी पेट घेतला. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी तातडीने प्रतिबंधक उपाय म्हणून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्सचे असोसिएशनचे माजी अध्यक्ष देवेन सोनी यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT