ठाणे: ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुदतबाह्य दूध, पावाचे पुड्यासह विविध नाशवंत माल सोसायटीच्या आवारात फेकून दिल्यानंतर सोसायटीतील रहिवाशी व महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रकार घडला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर नामांकित ऑनलाईन कंपनीचे गोदाम सील करण्यात आले आहे.
नौपाड्यातील शिवानंद सोसायटीत तळमजल्यावर मे. राजडी रिटेल प्रा. लि. कंपनीचे गोदाम आहे. या कंपनीकडून नामांकित बड्या कंपनीच्या नावाने ग्राहकांना दूध, पावसह जीवनावश्यक वस्तू व नाशवंत मालाची विक्री केली जाते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून विक्री न झालेले साहित्य शिवानंद सोसायटीच्या आवारात फेकून दिले जात होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत आक्षेप घेणाऱ्या सोसायटीच्या रहिवाशांवर दादागिरी केली जात होती.
महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांवरही शनिवारी सकाळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दादागिरी करण्याचा प्रकार घडला. याबाबत भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांना माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तातडीने धाव घेतली.
गोदामाची पाहणी करून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ) ठाणे कार्यालयाकडे तक्रार केली. अन्न प्रशासनाचे अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी शिवानंद सोसायटीतील गोदामाची व सोसायटीतील आवाराची पाहणी केली. त्यावेळी ठिकठिकाणी अस्वच्छता असल्याचे आढळले. गोदामात स्वच्छतेबरोबरच मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा स्वतंत्रपणे केला नसल्याचे आढळले.
त्यानंतर त्यांनी गोदाम सील करण्याचा निर्णय घेतला. मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट न लावता गोदामाच्या परिसरात विखुरल्या मुळे दुर्गंधी येत होती. मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट लावेपर्यंत दैनंदिन व्यवहार बंद करावेत. सहायक आयुक्तांकडे अटींची पूर्तता केल्याशिवाय गोदाम सुरू करू नये, अशी नोटीस गोदामाचे व्यवस्थापक कासिफ मोमिन याला बजावण्यात आली आहे.
दरम्यान, अन्न पदार्थांच्या बाबतीत हलगर्जी करणार्या संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ऑनलाईनद्वारे जीवनावश्यक वस्तू, दूध, पाव मागविल्यानंतर त्याची मुदत तपासून घ्यावी, असे आवाहन भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केले आहे.