Firing (File Photo)
ठाणे

Kalyan Crime | कल्याण तालुका हादरला; टिटवाळ्याजवळ मालमत्तेच्या वादातून वडिल-भावावर गोळीबार

काही तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

Titwala Property Dispute Shot

डोंबिवली : कल्याण तालुक्यातील शांत आणि साधं गाव म्हणून ओळखलं जाणारं गुरवलीपाडा गाव मंगळवारी रात्री अचानक गोळीबाराच्या आवाजाने हादरून गेलं. कारण रात्री सव्वानऊच्या सुमारास एकाच कुटुंबात मालमत्तेच्या वादातून कल्पेश बळीराम शेलार याने त्याच्याच वडिलावर आणि भावावर थेट गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या गोळीबारात बापलेक दोघेही रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळले. गोळीबाराचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या घरांमधील लोक धावत बाहेर आले आणि समोरचं भयानक दृश्य पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला, जखमींना तातडीने कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यातील एकाच्या पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,

या घटनेनंतर संपूर्ण शेलार कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. संशयित आरोपी कल्पेश बळीराम शेलार हा पांढऱ्या रंगाच्या कारमधून घटनास्थळावरून पसार झाला होता. पण कल्याण तालुका पोलिसांनी तपासाची चक्रं तातडीने फिरवून काही तासातच त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेली कल्पेशची पत्नी रसिका हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मालमत्तेच्या वादातूनच हा गोळीबार झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, या घटनेमागील नेमकं कारण काय ? वाद नेमका कशावरून पेटला आणि गोळी कुठून आणली गेली ? याचा सखोल तपास पोलिस करत असून तपासानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. एकेकाळी एकत्र नांदणाऱ्या कुटुंबात मालमत्तेसाठी रक्ताचे नाते विसरून गोळीबारापर्यंत मजल जाणे, ही घटना केवळ गुरवलीपाड्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कल्याण तालुक्यासाठी हादरवून टाकणारी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT