Kalyan News | ऐन दिवाळीत कल्याणच्या रामबागेवर शोककळा, देवदर्शनाला निघाले अन् नियतीने घात केला

भारंबे कुटुंबातील चौघांचा मोहोळ तालुक्यात वडाची वाडी गावाजवळ कार अपघातात मृत्यू
Kalyan Barambe Family Car  Accident
Kalyan Barambe Family Car AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

Kalyan Barambe Family Car Accident

डोंबिवली : दिवाळीच्या तोंडावर कल्याणच्या रामबाग परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी स्वतःच्या कारने निघालेल्या भारंबे कुटुंबाच्या कारला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वडाची वाडी गावाजवळ महामार्गावर कंटेनरची भीषण धडक बसली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण पण हृदयद्रावक अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुषार भारंबे हे गंभीर जखमी झाले आहेत. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबाचा प्रवास नियतीच्या क्रूर घावाने अर्ध्यावरच संपला.

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग परिसरातील राम मंदिरासमोर राहणारे भारंबे कुटुंब दिवाळीच्या सणानिमित्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. घरात सणाचा आनंद होता, देवदर्शनानंतर दिवाळी साजरी करायची असा मनात आराखडा होता. मात्र या कुटुंबावर काळाने घाला घातला. महामार्गावर कंटेनरला झालेल्या भीषण धडकेत तुषार भारंबे (४०) यांचा अवघ्या आठ वर्षांचा चिमुकला मुलगा पार्थ, पत्नी पूनम (३८), वडील विलास (६६) आणि आई शोभा (६३) अशा चार जणांचा मृत्यू झाला. तर तुषार भारंबे गंभीर जखमी झाले आहेत. एका क्षणात एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातील चार माणसे गेली आणि एकटा तुषार रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ही बातमी ऐकून कुणाचाही काळजाचा ठोका चुकेल अशीच आहे.

Kalyan Barambe Family Car  Accident
Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5: मेट्रो - ५ मुळे ४५ मिनिटांचा प्रवास २५ मिनिटांत होणार पूर्ण; नववर्षात प्रवाशांना गिफ्ट

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात एका हसत्या खेळत्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याचे वृत्त कल्याणात येऊन आदळताच राम मंदिर, चिकणघर आणि रामबाग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सणाच्या आनंदाऐवजी भारंबे कुटुंबीय राहत असलेल्या सुप्रभावी निवास परिसरात शोककळा पसरली असून भारंबे कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने स्थानिक रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. ज्या घरात दिवाळीच्या तयारीची लगबग सुरू होती त्या घरात आता एकीकडे आक्रोश तर दुसरीकडे परिसरात सन्नाटा पसरला आहे. शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र परिवार सगळेच सुन्न झाले आहेत. कुणाच्या तोंडून शब्द फुटत नाहीये, फक्त डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत.

देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाचा प्रवास नियतीच्या क्रूर घावाने संपल्याने भारंबे कुटुंबीय राहत असलेल्या संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. ज्यांना ही बातमी कळाली त्यांनी भारंबे कुटुंबाच्या घरी धाव घेतली. तुषार भारंबे लवकर बरे व्हावेत, यासाठी सर्वजण देवाकडे प्रार्थना करत आहेत. दिवाळीच्या दिव्यांनी उजळणारा परिसर आज शोकाच्या अंधारात बुडाला आहे. देवाच्या दारी जाणाऱ्या या कुटुंबाला देवाने का दुरावले असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. पण नियतीपुढे कुणाचे काहीच चालत नाही हे या दुर्घटनेतून अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.