मीरा रोड : एका मृत व्यक्तीच्या नावावर बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी (कुलमुखत्यारपत्र) तयार करून शेतकरी कुटुंबाची जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात शांती कन्स्ट्रक्शनचे मालक दिलीप व्होरा यांच्यासह त्यांच्या भागीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार रंजन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील कुटुंबाने त्यांच्या मालकीची 7,540 चौरस मीटर जमीन विकसित करण्यासाठी शांती कन्स्ट्रक्शनचे दिलीप व्होरा यांच्याशी करार केला होता. मात्र, बिल्डरने ठरलेली रक्कम वेळेवर न दिल्यामुळे पाटील कुटुंबाने हा करार अधिकृतपणे रद्द केला. यासंदर्भात त्यांनी बिल्डरला नोटीस बजावून वर्तमानपत्रात सार्वजनिक सूचनाही प्रसिद्ध केली होती. जेव्हा पाटील कुटुंबाने ही जमीन दुसऱ्या बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना धक्कादायक माहिती मिळाली.
जुन्या रद्द झालेल्या कराराचा गैरवापर करून शांती कन्स्ट्रक्शनने केवळ जमिनीची एकतर्फी नोंदणीच केली नव्हती, तर उच्च न्यायालयाची दिशाभूल करून त्यावर कोर्ट रिसीव्हरची नियुक्तीही करून घेतली होती. 2025 मध्ये पाटील कुटुंबाला समजले की, रजिस्ट्रार कार्यालयात बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी सादर करून बिल्डरने विक्री करार पूर्ण केला आहे.
मृत व्यक्तींच्या नावाचा आणि सह्यांचा वापर
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या चार जमीन मालकांच्या स्वाक्षऱ्या या कागदपत्रांवर दाखवण्यात आल्या आहेत, त्या व्यक्तींचा 27 मे 2025 पूर्वीच मृत्यू झाला होता. मृत व्यक्तींच्या नावाचा आणि बनावट सह्यांचा वापर करून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. पाटील यांच्या तक्रारीनंतर काशीगाव पोलिसांनी दिलीप व्होरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.