

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच यंदाची निवडणूक शिंदे शिवसेना व भाजप, युतीच्या माध्यमातून लढविणार की नाही यावर चर्चा सुरु होती. त्याला भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पूर्ण विराम दिला असला तरी युतीच्या नेत्यांचे रात्री उशिरापर्यंत भाजपकडे युतीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. भाजपने सेनेला जवळ न करता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा सोडल्यानेे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत सेना, भाजपची युती व्हावी, अशी आग्रही भूमिका सेनेचे परिवहन मंत्री तथा मिरा-भाईंदर शहर संपर्क प्रमुख प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. तर सेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा पावित्रा भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी घेतला आहे. युतीबाबत सेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. त्यावर चव्हाण यांनी युती होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. तर मेहता यांनी वरीष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी 24 डिसेंबर रोजी जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांच्या नावे पत्र पाठवून दोन्ही पक्षांच्या युतीबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय समिती गठीत केल्याचे कळविले. त्यात भाजपकडून आ. नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी जिल्हाध्यक्ष रवि व्यास तर सेनेकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खा. नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख राजू भोईर यांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार सरनाईक यांनी आपल्याला संपर्क साधून युतीवर चर्चा करण्याबाबत कळविल्याचे मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्याअनुषंगाने दोन्ही पक्षांच्या उभयतांमध्ये युतीबाबत चर्चा करण्यात आली असता त्यात सेनेने भाजपचे जे कार्यकर्ते पळविले आहेत ते आम्हाला परत करण्याचा मुद्दा उपस्थित केला. याचप्रमाणे मीरारोड येथील शिवार गार्डन या नियोजित जागेत टाऊन हॉलचे आरक्षण होते त्याला बगल देत त्यावर बेकायदेशीरपणे लग्नाचे हॉल सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे हि जागा पालिकेला परत करण्यात यावी. पालिकेने हि जागा सरनाईक यांच्या समर्थक विक्रम प्रताप सिंह यांच्या प्रताप फाऊंडेशनला दीर्घ मुदतीवर भाडेतत्वावर दिली आहे. यामुळे भाजपने हा कळीचा मुद्दा युतीच्या आड आणल्याचे बोलले जात आहे.
भाजप आ. मेहता यांच्याकडून उपस्थित केलेले मुद्दे योग्य नसल्याने ते सेनेला मान्य नसल्याने यंदाच्या निवडणुकीत सेना, भाजप युतीला पूर्णविराम लागल्याचे मेहता यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यानंतर सेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ मेहता यांच्या पक्ष कार्यालयात धाव घेत युतीबाबत चर्चा करण्याचे साकडे मेहता यांना घातले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ रात्री उशिरापर्यंत सुरु राहिल्याने युतीवर संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेनेला 21 जागांवर युती करण्याचा प्रस्ताव
याखेरीज भाजपच्या 66 जागा, भाजपने राष्ट्रवादीला 8 जागा दिल्याचे मेहता यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करीत एकूण 95 जागांपैकी भाजपच्या वाट्यातील एकूण 74 जागा वगळून उर्वरीत 21 जागांवर सेनेने युतीबाबत चर्चा करावी, असा प्रस्ताव मेहता यांनी सेनेपुढे ठेवला. त्याला सेनेने अमान्य करीत गतवेळच्या पालिका निवडणुकीत सेनेच्या 22 जागा निवडून आल्या असताना केवळ 21 जागांवर युती करण्याचा प्रस्ताव भाजपने पुढे करणे सेनेची हेटळणी करण्यासारखे असल्याची नाराजी सेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.