Rickshaw Drivers Marathi Training Pudhari
ठाणे

Rickshaw Drivers Marathi Training| महाराष्ट्रात राहताय तर मराठी आलीच पाहिजे : एकनाथ शिंदे

रिक्षा चालकांना मराठी शिकवणाऱ्या अभियानाचा समारोप; आता तीन महिन्यांची मुदत

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे. कायद्याचा बडगा दाखवून भाषा शिकवता येत नाही ती प्रेमाने शिकवता येते. ते आम्ही करून दाखवले. मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले.

राज्य सरकारचे परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ सांगता समारंभात ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

१०५ दिवस चाललेल्या शिवसेनेच्या अभियानातून १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली, असे सांगतानाच अभियानाचा हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठे आव्हान स्वीकारले आणि कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकविण्याचा मार्ग स्वीकारला. कायद्याने नाही, प्रेमाने भाषा शिकता येते, जे कायद्याने होऊ शकत नाही ते प्रेमाने होऊ शकते हे प्रताप सरनाईक यांनी करून दाखवले. आदेश किंवा भीती दाखवून मराठी भाषा शिकवता येत नाही असे म्हणत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.

तीन महिन्यांची मुदत

अजूनही काही रिक्षाचालक सोशल मीडियावर मराठी शिकणार नाही, असे व्हिडीओ टाकत आहेत. यापुढे मराठी बोलता आले नाही तर आणखी तीन महिन्यांची मुदत देऊन रिक्षाचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करणार मात्र तीन महिन्यांनंतरही जर मराठी बोलता आले नाही तर मात्र कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी दिला.

मराठी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकविण्याचा हा उपक्रम राबवत असताना पहाडाप्रमाणे पाठीशी ठाम उभे राहणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आभार मानले.

मी जर मराठी भाषेचा मंत्री झालो नसतो तर इतिहासात माझं नाव झालं नसतं याचे सगळे श्रेय उपमुख्यमंत्री शिंदे यांना जाते, असे सांगून उद्योग आंणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, आमचा रिक्षाचालक फक्त व्यावहारिक मराठी बोलणार नाही तर साहित्यिकांसारखा मराठी बोलेल, यासाठी पुढचा उपक्रम असेल. मराठी भाषा शिकल्यानंतर रिक्षा, टॅक्सी चालकाच्या चेहऱ्यावर तेज आले आहे, असेही सामंत म्हणाले.

मला उपक्रमाचे कौतुक - कर्णिक

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हा समारंभ मराठी भाषेच्या दृष्टीने अभूतपूर्व असून मला खूप कौतुक वाटतंय. परिवहन आणि आरटीओ यांचा संबंध काय, पण मराठीसाठी सोबत आलेत. आम्ही या विषयाकडे वेगळ्या अंगाने पाहतो, साहित्यिक म्हणून नाही तर सामाजिक अंगाने पाहतो, हे अभियान वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे कर्णिक म्हणाले.

भाषा जपा, माणसे तोडू नका आवाहन करतानाच मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे आता वय ९८ आहे. त्यांची जन्म शताब्दी ठाण्यात करू या, असेही शिंदे यांनी जाहीर केले.

आतापर्यंत १ लाख ६५ हजार रिक्षाचालकांनी मराठी शिकण्यासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ४० हजार अमराठी रिक्षाचालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतले आहे, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT