Eknath Shinde on Ladki Sunbai Abhiyan
ठाणे : लाडकी बहीण योजनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ‘लाडकी सूनबाई अभियान’ सुरू केले आहे. रविवारी एकनाथ शिंदेंनी ठाण्यात या अभियानाची घोषणा केली असून घरगुती हिंसाचाराने त्रस्त महिलांच्या मदतीसाठी हे अभियान राबवले जाणार आहे. सगळेच सासू- सासरे वाईट नसतात, ज्या सासू चांगल काम करतील त्याचाही सत्कार करणार, असंही शिंदेंनी सांगितले.
रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सूनबाई अभियानाची घोषणा केली. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला सगळ्या पदांपेक्षा जास्त मोठी वाटते, असे सांगत आता नवीन अभियान हे लाडक्या सुनेसाठी असल्याचे एकनाथ शिंदेंनी जाहीर केले.
आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे. त्यासाठी 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन' हे अभियान हाती घेत आहोत.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सासरच्यांमुळे आयुष्य संपवले होते. तेव्हापासून राज्यात विवाहित महिलांचा सासरी केला जाणारा मानसिक आणि शारीरिक छळ हा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी या अभियानाची घोषणा केली आहे. 'जो कोणी महिलेवर अत्याचार करेल त्याची गाठ शिवसेनेशी आहे, पीडित महिलांना शाखेतून मदत मिळेल', असे शिंदेंनी सांगितले. 'जिथे तुमच्याकडे फोन येईल तिथे पहिले समजावून सांगू नंतर आपली शिवसेना स्टाईल आहेच', असा इशाराच त्यांनी दिला.
मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करत असतो. कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तोही करत असतो. 'एक बार मैने कमिटमेंट की तो खुदकी भी नहीं सुनता'. जिथे कुठे आपत्ती असेल तिथे एकनाथ शिंदे धावून जाईल. मी दिलेला शब्द मोडत नाही.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा पुनरुच्चारही शिंदेंनी केला. लाडक्या बहीण योजनेत विरोधकांनी खोडा घातला, पण लाडक्या बहिणींनीच '232 नंबर'चा जोडा लाडक्या बहिणींनी विरोधकांना मारला, असा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीला विधानसभा निवडणुकीत 232 जागांवर दणदणीत विजय मिळाला होता. लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवून टाकली विरोधकांची दांडी, असंही ते म्हणाले.
लाडकी सूनबाई अभियान काय आहे?
लाडक्या सुनांच्या मदतीसाठी सुरक्षित सून ही हेल्पलाइन शिवसेनेने सुरू केली आहे.
'लाडकी सूनबाई अभियान' या हेल्पनाईनचा क्रमांक काय आहे?
सुरक्षित सून हेल्पलाइनचा क्रमांक 8828892288/ 8828862288 हा आहे.
सुरक्षित सून अभियानाच्या प्रमुख कोण आहेत?
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या लाडकी सून अभियानाच्या प्रमुख आहेत.