

ठाणे : गडकरी रंगायतन नाट्यगृह हे ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग झालेले आहे. त्यामुळे गडकरी रंगायतन ही एक फक्त बिल्डिंग नाही, तर जिवंत वास्तू आहे. मी पाहतोय तेव्हापासून ही जागा जागा खर्या अर्थाने जिवंत आणि कुठल्यातरी जबरदस्त ऊर्जेचा प्रेरणेचे स्त्रोत वाटते. गडकरी रंगायतन शिवाय ठाणे शहर नाही, हे ठाण्याचे हृदय आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नूतनीकृत वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी,आमदार निरंजन डावखरे, दिग्दर्शक अशोक समेळ, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे आणि प्रमुख कार्यवाह अजित भुरे, लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे,अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नूतनीकरण करण्यात आलेल्या गडकरी रंगायतन संदर्भात अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. ठाण्यात बाळासाहेब ठाकरे यांची सभा होती तेव्हा त्यांनी विचारले काय हवे, त्यावर एकाने सांगितले नाट्यगृह द्या आणि त्यातून ठाण्यात गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव क्रिडागृह झाले. या नाट्यगृहत अनेक नाटके झाली, तालीम झाल्या. अनेक कलावंत येथे घडले आणि याच ठिकाणी राजकीय सभा देखील झाल्याचे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरीमध्ये अजूनही काही उणिवा असतील तर सांगा, निधीची कमरतरता कधी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाट्यगृहामध्ये रंगकर्मींसाठी ज्या पद्धतीने टॉयलेट स्वच्छ ठेवले जातील तसेच येथे येणार्या रसिकांसाठी असलेली टॉयलेट देखील स्वच्छ ठेवा, अशी सूचना त्यांनी यावेळी पालिकेला दिली. साफसफाईमधून त्या वास्तूची ओळख कायम राहते, असेही त्यांनी सांगितले. नाट्यगृहाची दुरुस्ती करत असताना नाट्य कलावंतांच्या व कलाप्रेमीच्या सूचना महत्वाच्या होत्या, त्यामुळेच दुरुस्तीला काहीसा वेळ गेला असेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच आज सुंदर दिमाखदार गडकरी आपल्या समोर असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पालिका अभियंत्याचा सत्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
गडकरी रंगायतनमध्ये कॅफेटेरिया होणार
गडकरी रंगायतनमध्ये गडकरी कट्टा आहे, हे सुसंस्कृत ठाणेकरांचे भेटण्याचे ठिकाण आहे, आता गडकरीमध्ये स्टारबक्स सारख्या नामाकित कंपन्याचे कॅफेटेरिया सुरू करण्याबाबत मी आयुक्तांना सुचवले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तसाच पडदा वापरा...
राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये नव्या स्वरूपाचा पडदा वापरण्यात आला आहे. परंतु त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. जुना पडदा हा गडकरीची शान होती, त्यामुळे ज्या कोणी हा पडदा बनविला होता. त्यांच्याकडून पुन्हा तसाच पडदा बनवून घ्यावा, अशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली.
आम्हीसुद्धा राजकारणातील कलाकार...
रसिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी देखील केली. ज्याप्रमाणे नाटकातील कलाकार मंडळी आपली कला सादर करतात त्याचप्रमाणे आम्ही देखील काही प्रमाणात कलाकार असून करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी हे करावं लागले, असा टोला देखील शिंदे यांनी यावेळी लगावला.
माझ्या करियरची सुरुवात गडकरीपासूनच : अशोक हांडे
1977 मध्ये करियर येथे सुरू झाले. मंगल गाणी दंगल गाणीचा आमचा प्रयोग गडकरीत सुरू होता तेव्हा ठाण्यात दंगल झाली होती. मात्र त्यावेळेस कार्यक्रम संपेपर्यंत एकनाथ शिंदे खाली उभे होते. एक खरा कार्यकर्ता आणि एक खरा रसिक हे एकनाथ शिंदे असल्याचे मत यावेळी अशोक हांडे यांनी व्यक्त केले. शिंदे यांचे व्हिजन गडकरीमध्ये दिसत आहे. तर ठाणेकर रसिक हा जगात नंबर वन असल्याचेही ते म्हणाले.
ठाण्यात हापूस पार्क
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांनी ठाण्यात पूर्वी रस्त्याने जाताना हापूस आंबे खायला मिळत होते, मात्र आता ठाण्यातच हापुस पार्क उभारले जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.