

Eknath Shinde
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर होते. मागच्या आठवड्यात देखील ते दिल्लीला आले होते. आठवडाभरात पुन्हा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठल्याने त्यांच्या या दौऱ्याची चर्चा होत आहे. मंगळवारी (दि.6) रात्री उशिरा ते दिल्लीत पोहोचले. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. तर गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० मिनिटे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंद दाराआड २५ मिनिटे चर्चा केली. राज्यातील अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील समन्वय वाढवण्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वात अगोदर जिल्हा परिषद नंतर नगरपालिका आणि शेवटी महानगरपालिका अशा क्रमाने होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच महायुतीच्या घटक पक्षाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील वादग्रस्त मंत्र्याबाबत अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा झाली.
दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देताना पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागच्या आठवड्यात आलो तेव्हा त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज खासदारांसोबत भेटलो. ही सदिच्छा भेट होती. जास्त काळ गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी काम केले आहे. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत. माधुरी हत्तीबाबत देखील बैठकीत चर्चा झाली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. माधुरी हत्तीबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली. सरकार जनभावनेचा आदर करेल असे ते म्हणाले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएसोबत
एकनाथ शिंदे म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएला आमचा पाठिंबा असेल. यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदेंची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिंदे कुटुंबियांनी महादेवाची प्रतिमा दिली भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे पत्नी, सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. त्यांनी भगवान महादेवाची प्रतिमा पंतप्रधानांना भेट दिली. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेवसाठी पंतप्रधानांचे अभिनंदन केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ऑपरेशन महादेव यशस्वी झाल्याने पंतप्रधानांना भगवान महादेवाची प्रतिमा भेट दिल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणून मोदींना ११ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एनडीएला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिवसेना एनडीएतला चौथ्या क्रमांकाचा मित्रपक्ष आहे. भाजप शिवसेनेचे नाते फार जुने असून बाळासाहेब ठाकरेंनी ही युती घडवली, असे ते म्हणाले. बंद दाराआड काही नसते, सगळे उघड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे १० जनपथकडे आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे
एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे दहा जनपथकडे जात आहेत. आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे जात आहोत. बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही जात आहोत. त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आमची तशी कंपनी नाही. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
ये पब्लिक है सब जानती है
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन दगडावर पाय ठेवून माणूस काम करतो. तेव्हा त्याचे काय होते? हे आपल्याला माहिती आहे. विश्वास गमावलेले लोक असे काम करतात. म्हणून ते दोन दगडावर पाय ठेवून असतात. ये पब्लिक है सब जानती है अशा मिश्किल शब्दांत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया दिली. ठाकरेंनी हिंदुत्व सोडले म्हणून ते राहुल गांधीना भेटतात. सावरकरांचा अपमान झाला तेव्हा ठाकरे मूग गिळून गप बसले, असे ते म्हणाले.
तक्रारीसाठी दिल्लीत आलो नाही
महायुती सरकार मधील मतभेतांवर विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, तक्रार करण्यासाठी दिल्लीत आलो नाही. तक्रार करणारा मी नाही. धोरणात्मक विषयावर दिल्लीत चर्चा होते. राज्यातील पालकमंत्री, निधी वाटप यासारख्या अंतर्गत विषयांवर निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आणि आम्ही सक्षम आहोत.
"ऑपरेशन टायगर" दररोज सुरू
ऑपरेशन टायगर रोज सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे १२४ माजी नगरसेवक आमच्या पक्षात आले. दररोज राज्यभरात पक्षप्रवेश होत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.