Drunk Driving Accident Thane Pudhari
ठाणे

Drunk Driving Accident Thane: दारूच्या नशेत वाहनचालकांचा कहर; श्री मलंगगड परिसरात पहाटे सलग तीन अपघात

नेवाळी–श्री मलंगगड रोडवर भीषण घटना; तरुणाचा मृत्यू, दोन अपघातांत थोडक्यात जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : श्री मलंगगड परिसरात मद्यपी वाहनचालकांचा कहर पुन्हा एकदा समोर आला असून,नववर्षाच्या सुरुवातीलाच नेवाळी श्री मलंगगड रोडवर पहाटेच्या सुमारास सलग तीन अपघात झाले आहेत. तिन्ही अपघातांमध्ये चालक दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या तिन्ही अपघातांची नोंद हिललाईन पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.

पहिला आणि सर्वात भीषण अपघात काकडवाल गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडला आहे. दुचाकीस्वार महादेव दुबे (वय 25), हा व्यवसायाने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा तरुण, आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक बसली. अपघात इतका तीव्र होता की गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्याला मृत घोषित केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मद्यपी वाहनचालकांमुळे निष्पाप जीव गमावल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

दुसरा अपघात कुशिवली गावाजवळ घडला आहे. येथे एका चारचाकी वाहनाने रस्त्यालगत असलेल्या संरक्षण भिंतीला जोरदार धडक दिली आहे. वाहनात चार जण प्रवास करत होते आणि ते सर्वजण मद्यपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे.

तिसरा अपघात डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावरील नेवाळी चौक परिसरात, आत्माराम नगर येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. दुचाकीस्वाराने एका रिक्षाला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे या अपघातात रिक्षाचालक देखील दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले आहे. जखमी रिक्षाचालकावर नेवाळी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या घटनेत गंभीर दुखापत झाली नसली तरी, महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT