टिटवाळा (ठाणे) : टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिस स्टेशन हद्दितील एका २६ वर्षीय विवाहित तरुणीने आपल्या पतीवर गंभीर आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सतत शारीरिक व मानसिक छळ, संशय, मारहाण, शिवीगाळ, धमक्या आणि शेवटी दोन लहान मुलांना जबरदस्तीने घेऊन जाण्यापर्यंतचा प्रवास या तरुणीने आपल्या फिर्यादीत उघड केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
फिर्यादीनुसार, डॉकयार्ड रोड येथे राहणाऱ्या काळात तिची ओळख बाबु अन्चर अली सय्यद याच्याशी झाली. ओळख प्रेमात बदलली आणि २०१८ मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर पीडितेचे नाव बदलून सना बाबु अली सय्यद करण्यात आले. लग्नानंतर टिटवाळ्यात पतीच्या भावाच्या घरात राहायला गेल्यावर तिला केवळ घरकामच नव्हे तर भावाच्या तीन मुलांची जबाबदारीही सांभाळावी लागली. यावेळी डॉकयार्डमध्ये एका जुन्या मित्राशी झालेल्या साध्या संवादावरून घरात अफवा पसरवल्या गेल्या. याचा परिणाम असा झाला की पतीने तिच्यावर संशय घेऊन मारहाण सुरू केली.
एक वर्ष भायखळ्यात राहिल्यानंतर पती-पत्नी टिटवाळ्यात आले. मुलं होत नसल्याच्या कारणावरून तिला मारहाण आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. नंतर तिला दोन मुलं झाली - मोठा मुलगा (२ वर्ष ८ महिने) आणि धाकटा मुलगा (११ महिने). मात्र मुलं असूनही पतीचा छळ थांबला नाही. परिस्थिती असह्य झाल्याने तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला, पण पतीने घटस्फोट देणार नाही, पण मारून टाकेन अशी धमकी दिली. एका घटनेत पतीच्या मोठ्या भावाने तर हिला चिरून कुकरमध्ये टाकून देऊ, कोणालाही कळणार नाही अशी थरारक धमकी दिल्याचेही तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पतीने दोन्ही मुलांना जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतले असून, आजतागायत आईला त्यांची भेट घडवून आणलेली नाही. मोठा मुलगा पित्याच्या मारहाणीमुळे भीतीत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला लव जिहादचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. प्रेमसंबंधांच्या नावाखाली धर्मांतर आणि त्यानंतरचा छळ या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी माझ्या पतीसाठी आई-वडिलांच्या विरोधात लग्न केलं, पण आज तोच माझ्या चारित्र्यावर संशय घेतो. माझ्या मुलांशिवाय मी जगू शकत नाही, असा आक्रोश पीडितेने व्यक्त केला आहे. विश्व हिंदू परिषद कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुधा जोशी, विश्व हिंदू परिषद कल्याण जिल्हा सहमंत्री लक्ष्मीकांत पाठक, बजरंग दल जिल्हा संयोजक अनिकेत महात्रे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक दिनेश काले यांच्यासह ५०-६० बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात हजर राहून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय प्रयत्न करत आहेत.