Dombivali Eknath Shinde Vs Ravindra Chavan Abhijeet Tharwal BJP
डोंबिवली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण काही थांबण्याचे चिन्हे नाहीत. बुधवारी शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत 'कमळ' हाती घेतला. ठाणे जिल्ह्यातील फोडाफोडावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच शिंदेंच्या निकटवर्तींयांनाच भाजपात घेतल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
डोंबिवली जवळच्या देसले पाड्यातील शिवसेना शिंदे गटाचे उपतालुकाप्रमुख विकास देसले मागील काही दिवसांपासून भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदे गटाचे विकास देसले यांना त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
अखेर बुधवारी माजी मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक राहुल दामले, नरेंद्र सूर्यवंशी यांंच्या उपस्थितीत विकास देसले यांनी आपल्या समर्थकांसह डोंबिवलीतील कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला. देसले हे आमदार राजेश मोरेंचे खंदे समर्थक म्हणूनही ओळखले जातात.
त्यापाठोपाठ शिवसेनेचे डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक सदानंद थरवळ यांचे सुपुत्र अभिजीत थरवळ यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण हे बुधवारी दुपारी थरवळ यांच्या गोग्रासवाडीतील जनसंपर्क कार्यालयात गेले. तेथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. चव्हाण यांनी अभिजीत थरवळ यांचे स्वागत करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवडणुकांच्या तोंडावर फोडाफोडीमुळे महायुतीमधील धुसफूस वाढण्याची चिन्हे आहेत. २७ गावांमधील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाने डोंबिवलीलगतच्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी शिंदे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी महेश पाटील आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये दाखल झाले होते. ग्रामीणमधील या नेत्यांना भाजपात आणण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, दीपेश म्हात्रे, महेश पाटील ही तरुण नेत्यांची फळी सक्रीय झाल्याचे समजते.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजपामध्ये केलेल्या प्रवेशानंतर डोंबिवलीत शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका करण्यात आली. आमच्याकडे येण्यासाठी तुमच्या पक्षातील अनेक लोकं रांगेत असूनही आम्ही युती धर्माचे पालन करत असल्याचे सांगत आमदार राजेश मोरे यांनी पुन्हा एकदा युतीधर्माची आठवण करून दिली. आमच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वेगवगेळी आमिषे दाखवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महायुतीच्या विरोधात जाऊन काम करत आहेत.
रविंद्र चव्हाण हे ४ वेळा आमदार राहूनही त्यांना पक्ष बांधणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते घ्यावे लागणे हे दुर्दैव असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे डोंबिवली ही सुशिक्षित नागरिकांची नगरी असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण इथले वातावरण बिघडवत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही आतापर्यंत संयमी भूमिका घेतली असून त्यांना इतक्या वर्षांत त्यांना भाजपा पक्ष मजबूत का करता आला नाही ? आमच्या कार्यकर्त्यांसोबत आमची विकासकामेही कशासाठी चोरत आहात ? असा सवाल उपस्थित करून उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.