Dombivli rickshaw protest pudhari photo
ठाणे

Dombivli rickshaw protest : एक रुपयाची भाडेवाढ नामंजूर... रॅपिडो बंद करा...

कल्याणात रिक्षाचालकांचा आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या; बेमुदत बंदचा आंदोलनकर्त्यांकडून इशारा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : शासनाने जाहीर केलेली एक रुपयाची तुटपुंजी भाडेवाढ रिक्षाचालकांना मान्य नाही. तसेच रॅपिडो ई-बाईक टॅक्सीची प्रवासी वाहतूक तातडीने बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालक आणि कोकण विभाग रिक्षा/टॅक्सी महासंघाच्या वतीने उंबर्डे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त रिक्षाचालकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्या मांडल्या.

या आंदोलनात रिक्षाचालकांनी स्पष्ट भूमिका मांडली, सध्याची एक रुपयाची भाडेवाढ अत्यंत अपुरी असून ती पूर्णपणे नामंजूर आहे. इंधनाचे वाढते दर, महागाई आणि वाहन दुरुस्तीचा खर्च पाहता रिक्षाच्या भाडेवाढीचा फेरविचार करून पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये व त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये असा भाडेदर लागू करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

अवैध प्रवासी वाहतूक आवरा

रिक्षाचालकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत रॅपिडो ई-बाईक टॅक्सीला देण्यात आलेली प्रवासी वाहतुकीची परवानगी तातडीने रद्द करावी, अशी मागणीही महासंघाने लावून धरली. यासोबतच कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर परिवहन विभागाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून प्रामाणिक रिक्षाचालकांचे पोट भरणे सुरू राहील, अशीही मागणी करण्यात आली.

...अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अटळ

रिक्षाचालकांच्या या न्याय्य मागण्यांवर शासन आणि परिवहन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत रिक्षा बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा कोकण विभाग रिक्षा/टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी या आंदोलनादरम्यान दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT