ठाणे

डोंबिवली : फोन-पे वापर करत मैत्रिणीकडून पैश्यांची ऑनलाईन चोरी

अमृता चौगुले

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : नोकरी निमित्त भागीदारी पद्धतीने डोंबिवलीतील भाड्याच्या घरात एकत्र राहणाऱ्या एका मैत्रिणीने दुसरीला दगा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. काही कळू न देता पहाटे तीन वाजता मैत्रिणीच्या मोबाईल फोनचा वापर करुन दुसऱ्या मैत्रिणीने 28 हजार रुपये बँकेतून परस्पर घेतले. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील संगिता वाडीतल्या परिक्रमा सोसायटीत राहणाऱ्या प्रियंका रामदास पडोळ (वय 27) या तरुणीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तिची भागीदार मैत्रिण जईता ब्रोजेन आचार्य हिच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रियंका आणि जईता या दोघी मैत्रिणी नोकरीच्या निमित्ताने संगितावाडी येथे एक सदनिका भाड्याने घेऊन तेथे भागीदारी पद्धतीने राहतात. प्रियंका आणि जईता या कामावरुन परतल्या. रात्री दोघींचे जेवन झाल्यानंतर त्या झोपी गेल्या. जईताने पहाटे तीन वाजता गुपचूप उठून प्रियंकाचा मोबाईल घेतला. प्रियंकाच्या मोबाईलमधील फोन-पे वापर करत प्रियंकाच्या आयसीआयसीआय बँक खात्यामधून 28 हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने धिरेन्द्र कुमार लालबहादुर राय नामक एका व्यक्तीच्या बँक खात्यावर घेतले. आणि त्‍यानंतर ते पैसे जईताने धिरेंद्रच्या माध्यमातून स्वत:च्या बँक खात्यावर घेतले.

सकाळी प्रियंकाला मोबाईलवर बँकेचे मेसेज आले. रात्री कोणताही व्यवहार केला नसताना अचानक आपल्या बँक खात्यामधून पैसे कुणी वळते केले म्हणून अस्वस्थ झालेल्या प्रियंकाने बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी तिला आपल्या खोलीत राहणाऱ्या मैत्रिणीनेच हा सगळा गैरप्रकार केल्याचे लक्षात आले. आपल्यासोबत राहुन आपली फसवणूक आणि चोरी केल्याबद्दल प्रियंकाने जईता विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT