डोंबिवली शहर : शहरभर ‘स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली’ असा गाजावाजा सुरू असताना, प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या स्वतःच्या अंगणातच घाणीचा दरबार भरलाय! डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात बॅनर, लोखंडी सामान आणि जप्त केलेल्या फेरिवाल्यांच्या वस्तू याचे डोंगर रचले गेले आहेत. पावसाने हा कचरा सडून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढल्याने कर्मचाऱ्यांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत.
‘स्वच्छतेचे धडे देणाऱ्या पालिकेने आधी स्वतःच्या आवाराची साफसफाई करावी!’ असा संतप्त सूर आता नागरिकांच्या तोंडून उमटू लागला आहे. एकीकडे शहर स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च होत असताना, दुसरीकडे त्याच पालिकेच्या कार्यालयाच्या आवारातच कचऱ्याचे डोंगर साचले आहेत, ही मोठी विडंबनात्मक स्थिती आहे.
कार्यालय परिसरात सडका कचरा, बॅनर, लोखंडी वस्तू आणि फेरिवाल्यांच्या जप्त वस्तूंचा ढिगारा इतका वाढलाय की पाहणाऱ्यांना क्षणभर वाटावे हे पालिकेचे कार्यालय की कचरा डेपो? दिवाळीनंतर शहरभर राबविलेल्या अतिक्रमणविरोधी व बॅनरबाजीविरोधी कारवाईत जप्त केलेल्या वस्तू थेट या विभागीय कार्यालयातच आणून टाकण्यात आल्या आहेत. या वस्तू पावसामुळे सडून दुर्गंधी व डासांचा त्रास वाढत असून, आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी एका खाजगी कंपनीला कोट्यवधींचे कंत्राट दिले असले, तरी शहरातील रस्त्यांप्रमाणेच आता पालिकेच्याच आवारात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव स्पष्टपणे दिसत आहे.