ठाणे

Dombivli News : केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीची गर्भधारणा चाचणी टेस्ट पॉझिटिव्ह

खासगी रुग्णालयातील चाचणी निगेटिव्ह आल्याने प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Shastri Nagar Hospital Pregnancy Test Controversy

डोंबिवली : डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणानंतर डोंबिवलीतील महानगरपालिकेचे शास्त्रीनगर रूग्णालय पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उपचारासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणा चाचणी अहवालावरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. हिमोग्लोबिन कमी झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या या मुलीची रूग्णालयात तीन वेळा गर्भधारणा चाचणी करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. मात्र त्याच मुलीची चाचणी बाहेर खासगी प्रयोगशाळेत केली असता अहवाल निगेटिव्ह आल्याने शास्त्रीनगर रूग्णालय आता पुन्हा चर्चेत आले आहे.

या संदर्भात कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमोग्लोबिन कमी असल्याच्या कारणामुळे मुलीला उपचारासाठी शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रूग्णालयाने मुलीची तीन वेळा गर्भधारणा चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

कुटुंबीयांनी खबरदारी म्हणून त्याच दिवशी मुलीची चाचणी डोंबिवलीतील एका खासगी प्रयोगशाळेत करून घेतली. तेथील अहवालात मात्र गर्भधारणा नसल्याचे म्हणजेच निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. एकाच मुलीचे दोन ठिकाणी वेगवेगळे अहवाल आल्याने कुटुंबीयांनी रूग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शास्त्रीनगर रूग्णालय हे केडीएमसीचे महत्त्वाचे प्रसूती आणि आरोग्य केंद्र मानले जाते. अशा संवेदनशील प्रकरणात अल्पवयीन मुलीची परवानगीशिवाय आणि गरज नसताना वारंवार गर्भधारणा चाचणी का करण्यात आली, तसेच अहवालात तफावत का आली याबाबत कुटुंबीयांनी प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे.

या संदर्भात शास्त्रीनगर रूग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रूग्णालयात हिमोग्लोबिन कमी असलेल्या रूग्णांसाठी सर्वसमावेशक तपासणीचा भाग म्हणून गर्भधारणा चाचणी केली जाते. तीन वेळा चाचणी झाल्याच्या आरोपावर प्रशासन म्हणते की तांत्रिक कारणामुळे रि-टेस्ट करावी लागली असावी. अहवालातील विसंगतीची अंतर्गत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकांची संमती घेतली का?

या प्रकरणावर वैद्यकीय तज्ज्ञांनी भाष्य करताना सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या बाबतीत कोणतीही संवेदनशील चाचणी करताना पालकांची लेखी संमती घेणे बंधनकारक आहे. तसेच लॅबमध्ये वापरल्या जाणाऱ्या किटची गुणवत्ता, स्टोरेज आणि तंत्रज्ञाचे प्रशिक्षण यामुळे अहवालात फरक पडू शकतो. दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अहवाल आल्यास रक्त तपासणी, अल्ट्रासाऊंड आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पुष्टी करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात रूग्णाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

गर्भधारणा चाचणी अहवालात तफावत कशी?

या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेतील विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. रूग्णालयाने या संदर्भात कोणती प्रक्रिया अवलंबली, चाचणी कोणत्या पद्धतीने करण्यात आली आणि अहवालातील विसंगतीचे कारण काय ? याचा खुलासा होणे आवश्यक आहे अशी मागणी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. केडीएमसी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT