

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील संदीप हॉटेल, बिर्ला कॉलेज परिसर, आधारवाडी आणि स्टेशन रोड परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कल्याणमध्ये सात तासांत १३० जणांना भटक्या श्वानाचा चावा घेतल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर केडीएमसीने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी या संदर्भात माहिती सादर केली आहे. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णाल्याने दिलेल्या अहवालानुसार, रविवारी ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी रुक्मिणीबाई रुग्णालयात एकूण ५८ नागरिक कुत्रा चावल्याने उपचारासाठी आले होते. त्यापैकी १७ नागरिकांना संदीप हॉटेल व बिर्ला कॉलेज परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार अँटी-रेबीज व्हॅक्सिन, इक्वाईन रेबीज इम्युनोग्लोबुलिन आणि इतर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित रुग्णांना पुढील डोस आणि वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात आले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कल्याणकर पादचाऱ्यांना चावा घेणाऱ्या संशयित कुत्र्याला केडीएमसीच्या पथकाने पकडून निर्बीजीकरण केंद्रात हलवले आहे. तसेच सदर परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले.
केडीएमसीकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कुत्रा चावल्यास घाबरून न जाता तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत आणि लसीकरणाचा कोर्स पूर्ण करावा. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता प्रशासनाने लवकरात लवकर निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहीम वेगाने राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर १०० हून अधिक जणांना श्वानदंश झाल्याचे सांगतात. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयुक्त अभिनव गोयल १२ ते १३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे बोलतात; तर जनसंपर्क विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार ५८ जणांना श्वानदंश झाला आहे. "आकड्यांची फिरवाफिरव कशासाठी?" असा सवाल संतप्त कल्याणकरांनी उपस्थित केला आहे. "चावऱ्या कुत्र्यांनी लक्ष्य केलेल्या नागरिकांच्या आकडेवारीची फिरवाफिरव करण्यापेक्षा भटक्या कुत्र्यांबाबत ठोस उपाययोजना करा," अशी मागणी सोशल मीडियावर कल्याणकर नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.