

डोंबिवली : कल्याणच्या खडकपाडा आणि स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्याने १५० हून अधिक पादचाऱ्यांचे लचके तोडल्याच्या घटनेनंतर कल्याणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांच्या सततच्या तक्रारींनंतर, तसेच पिसाळलेला कुत्रा जेरबंद केल्याची खबर मिळताच केडीएमसी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी कल्याणातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी असलेल्या डॉग सेंटरला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी निर्बीजीकरण केंद्रातील सुविधा, लसीकरणाची प्रक्रिया आणि पकड मोहिमेची माहिती घेतली.
यावेळी बोलताना केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल म्हणाले, "नागरिकांच्या सुरक्षेला आमचे प्रथम प्राधान्य आहे. परिसरात वाढलेल्या घटनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. निर्बीजीकरण केंद्राची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. दररोज किमान ५० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येईल, अशी क्षमता असलेले ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. दररोज ४० ते ५० म्हणजेच वर्षाला १७ ते १८ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या सूचना एजन्सीला दिल्या आहेत. शहरातील सर्व संवेदनशील भागांत विशेष पथके तैनात करून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवण्यात येईल. सर्व कुत्र्यांचे शंभर टक्के निर्बीजीकरण आणि अँटी-रेबीज लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक असेल. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे."
सोमवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्टीकरण दिले. एका कुत्र्याने १०० ते १५० नागरिकांना चावा घेतल्याच्या वृत्ताचे खंडन करताना ते म्हणाले, "वास्तविक पाहता १० ते १२ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे, ही बाबदेखील गंभीर आहे. चावणाऱ्या त्या कुत्र्याला रात्रीच पकडले आहे. आणखी एका कुत्र्याला पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले असून, त्याही कुत्र्याला निर्बीजीकरण केंद्रात आणून उपचार करण्यात येतील."
याप्रसंगी महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनीदेखील नागरिकांना आश्वस्त केले. त्या म्हणाल्या, "लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वांत जास्त त्रास होत आहे. त्यामुळे प्रशासन कोणतीही ढिलाई सहन करणार नाही. डॉग सेंटरमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा वाढवण्यात येतील. तसेच नागरिकांनीही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि कुत्र्यांना रस्त्यावर अन्न टाकू नये," असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, कुत्र्याने चावा घेतल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत आणि घटनेची माहिती वॉर्ड कार्यालयाला द्यावी, अशी सूचना केडीएमसीने नागरिकांना दिली आहे. या कारवाईनंतर आता कल्याण-डोंबिवलीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती प्रमाणात सुटतो? याकडे कल्याण-डोंबिवलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.