Dombivli MIDC Water Contamination pudhari photo
ठाणे

Dombivli MIDC Water Contamination : एमआयडीसीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे रवाना; आरोग्य विभागाची घरोघरी तपासणी

पाण्याच्या वाहिन्यांचे आणि साठवण टाक्यांचे ऑडिट करण्यात यावे आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरात एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून येणाऱ्या पाण्यात लालसर रंगाच्या अळ्या आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दैनिक पुढारीने या संदर्भात 'एमआयडीसीच्या पाण्यात आढळल्या अळ्या' या मथळ्याखाली २५ नोव्हेंबरच्या अंकात सचित्र वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तत्काळ गंभीर दखल घेतली.

केडीएमसीच्या आरोग्य विभागातील टीमने बुधवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान मिलापनगरमधील आरएल १३६ बंगलो व परिसरातील पाण्याचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

आरोग्य विभागाच्या या टीमने मिलापनगर आणि निवासी परिसरात फिरून कुणी रहिवासी साथीच्या किंवा इतर जलजन्य आजाराने ग्रस्त आहेत का? याची घरोघरी फिरून माहिती घेतली. विशेष म्हणजे ज्या मिलापनगर परिसरातील बंगल्याच्या पाण्यात अळ्या आढळून आल्या. त्या ठिकाणापासून खासदार निवासस्थान जवळच असल्याने केडीएमसी आरोग्य टीमने त्या परिसरात पण पाहणी केली.

आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हुले यांच्या मार्गदर्शना -खाली आरोग्य सेवक भाऊसाहेब हरणे आणि त्यांची टीम घरोघरी जाऊन पाहणी करत असून गुरुवारी देखील ही पाहणी चालूच राहणार आहे.

शासनाच्या आरोग्य विभागाने देखिल पाण्यात अळ्या सापडल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून याचा अहवाल व माहिती स्थानिक प्राधिकरणांकडून घेणार असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी जेव्हा एमआयडीसी कडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात लालसर रंगाच्या अळ्या आढळल्या तेव्हा एमआयडीसीकडून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. एकंदर या प्रकाराची गंभीर दखल शासनाच्या सर्वच विभागाने घेतल्याचे दिसून येत आहे.

दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी...

बुधवारी सकाळी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत आणि केडीएमसी आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हुले यांनी निवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि सदर प्रश्न शासन पातळीवर व माध्यमांत पोहचविणारे या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. पाण्याच्या वाहिन्यांचे आणि साठवण टाक्यांचे ऑडिट करण्यात यावे आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT