

सोलापूर : दुष्काळामुळे अधिक संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतीचे वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार १११ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट ३०० कोटी ९१ लाख १५ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.
मात्र अद्याप ६६ हजार ३८८ पात्र शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून, त्यांच्या खात्यावर अद्याप निधी जमा झालेला नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचे लक्ष प्रशासनाकडे लागले आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दुष्काळी शेतकऱ्यांना पीक नुकसानापोटी देण्यात येणाऱ्या मदतीचे पीक वर्गनिहाय आणि क्षेत्रनिहाय निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पडताळणीची प्रक्रिया सुरू असताना, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.