Dombivli MIDC Water Contamination Pudhari
ठाणे

Dombivli MIDC Water Contamination: डोंबिवली एमआयडीसीच्या नळाच्या पाण्यात लालसर अळ्या; आरोग्याचा प्रश्न गंभीर

थेट जलवाहिनीतून घरात येणाऱ्या पाण्यात अळ्या आढळल्याचा दावा; पाण्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरात पाईपलाईनमधून घरात येणाऱ्या पाण्यात वळवळणाऱ्या अळ्या दिसत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या प्रकारामुळे रहिवासी घाबरले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून मिलापनगर आणि इतर निवासी भागात एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून थेट घरात, इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून नव्हे, तर नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात लालसर रंगाच्या अळ्या आढळून येत आहेत.

मिलापनगरमधील बंगलो प्लॉट मध्ये आणि आजूबाजूच्या बंगल्यातही अशाच लालसर रंगाच्या अळ्या नळातून येत असल्याचे दिसून आल्या. सदर बंगल्यात राहणाऱ्या अश्विनी देशपांडे/कुलकर्णी या गृहिणीला गेल्या दोन दिवसांपासून या लालसर रंगाच्या अळ्या येत असल्याचे आढळून असल्याने त्यांनी मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरुण जोशी आणि कार्यकारिणी सदस्य राजू नलावडे यांना संपर्क करून हा प्रकार प्रत्यक्ष दाखविला.

मंगळवारी एमआयडीसी कार्यालयाला गुरुनानक जयंती निमित्त सुट्टी असल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांना मेसेजद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. साधारणत: एक महिन्यापूर्वी एमआयडीसीच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. त्याची तक्रार एमआयडीसीकडे केल्यावर त्यांनी पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले; परंतु त्याचा तपासणी अहवाल अद्याप सार्वजनिक जाहीर केला नाही किंवा रहिवाश्यांना त्याची माहिती दिली नाही.

एमआयडीसीकडून पाणी टंचाईमुळे पाणी कपात चालू असून सर्व रहिवासी पाण्याचा वापर जपून करत आहेत. त्यात आता अशा अळ्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करायचा कसा? असा सवाल रहिवाश्यांनी उपस्थित केला आहे.

याहून भयंकर म्हणजे एमआयडीसीसह ग्रामीण परिसरात साथीचे रोग पसरल्याचे दवाखान्यांतील वाढत्या रुग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे. साथीचे आजार टाळण्यासाठी पाणी उकळून व गाळून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात निवासी विभागातील रहिवासी असलेले प्राख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांनी गंभीर चिंता व्यक्त करून प्रतिक्रिया दिली आहे. नळाद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ही जलपुरवठा यंत्रणेतील अस्वच्छता, दूषितपणा किंवा देखभालीतील गंभीर त्रुटींची निदर्शक असू शकते.

अशा पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड, अतिसार, गॅस्ट्रो एन्टेरायटिस, आमांश आणि हेपेटायटिस ए व ई यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका संभवतो. अळ्या डासांच्या असल्यास डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाचाही अप्रत्यक्ष धोका निर्माण होऊ शकतो.

रहिवाश्यांना अर्थात ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविणे ही एमआयडीसी आणि महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. तातडीने पाण्याचे नमुने तपासणे, जलवाहिन्या व साठवण टाक्यांचे ऑडिट करणे आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.

दूषित पाणी हे आजारांसाठी निर्माण झालेले आमंत्रण आहे, असेही डॉ. पाटे यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले. कर्जतमध्ये पर्यावरण बचाव संघर्ष समितीने सातत्याने निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, वाचली पाहिजे याकरिता संघर्ष केलेला असून हा संघर्ष सुरूच राहणार आहे.
-ॲड. कैलास मोरे, पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT