डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात राहणाऱ्या रहिवाशांना महानगरकडून गॅस कंपनीकडून घरगुती गॅसचा पुरवठा केला जातो. गॅसच्या वितरण वाहिन्यांमध्ये तातडीने देखभाल आणि दुरूस्तीची कामे करण्यासाठी शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या 8 तासांच्या कालावधीत एमआयडीसीच्या निवासी विभागाचा गॅस पुरवठा बंद राहणार असल्याचे महानगर गॅसचे संचालन आणि देखभाल दुरुस्तीच्या विभागाच्या वरिष्ठांनी एमआयडीसी निवासी विभागातील रहिवाशांना कळविले होते. या आठ तासांच्या कालावधीत गॅस बंद असल्याने रहिवाशांची विशेषतः गृहिणींची खूपच परवड झाली होती.
वर्षभरात गॅस गळतीमुळे अपघात झाल्याने देखभाल/दुरूस्तीच्या नावाखाली महानगर गॅसचा घरगुती पुरवठा बंद राहण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. परिणामी अशा घटनांमुळे रहिवाशांची कुचंबणा होत आहे. घरात चोवीस तास महानगरचा गॅस उपलब्ध झाल्याने रहिवाशांनी आपापल्या घरातील गॅसचे सिलिंडर एचपी, बीपी आणि इतर कंपन्यांना परत केले आहेत. महानगरचा गॅस पुरवठा बंद राहिला की स्वयंपाक कसा करायचा करायचा? असा प्रश्न गृहिणींना पडत आहे. महानगर गॅसचा पुरवठा बंद झाल्यावर घरात गरम पाणी करणे, स्वयंपाक करणे, आदी प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक रहिवाशांनी विजेवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. अनेकदा तर या शेगड्यांवर स्वयंपाक करतानाच वीज पुरवठा खंडित होतो. एमआयडीसीच्या निवासी विभागात विजेचा वारंवार लपंडाव सुरू असतो. त्यामुळे एकाचवेळी गॅस पुरवठा बंद आणि त्याचवेळी वीज पुरवठा बंद झाला की रहिवाशांची, विशेषतः गृहिणींची तारांबळ उडते.
मुलांचा आणि कामावर जाणाऱ्यांचा जेवणाचा डबा कसा करून द्यायचा, असा सवाल गृहिणींना पडत असल्याचे या भागातील रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले. एक ते दोन तास महानगरचा गॅस पुरवठा बंद असेल तर रहिवासी तेवढा वेळ समजून घेतात. मात्र आठ आठ तास गॅस पुरवठा बंद राहत असल्याने रहिवाशांना पोळी-भाजी केंद्र वा हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
महानगर गॅसच्या वरिष्ठांनी शुक्रवारी दिवसभरात डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात घरोघर नोटिसा पाठवून महानगरचा गॅस पुरवठा देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी शनिवारी आठ तास बंद राहणार असल्याचे कळविले होते. सायंकाळी 6 नंतर गॅसचा पुरवठा सुरळीत झाल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. मात्र दिवसभर या भागातील साऱ्यांची परवड झाली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून घरातून पोळी-भाजी किंवा घरीच तयार केलेला डबा आणावा. त्यात बाहेरील खाद्य पदार्थ नसावेत, अशा बहुतांशी शाळांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गॅस पुरवठा बंद असला की मुलांना शाळेत जाताना जेवणाचा डबा करून देण्यात आमची तारांबळ उडते. अशावेळी गॅस पुरवठा बंंद आहे असे कारण आम्हाला सांगता येत नसल्याचे अनेक पालकांनी सांगितले.