डोंबिवली : डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपूल परिसरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह सारेच त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले असून त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही ठिकाणी २४ तास नो पार्किंग लागू करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे.
वाहतुकीच्या मार्गात बदल का करण्यात आले आहे?
मध्य रेल्वे मार्गावरील कोपर उड्डाणपूलाच्या उतारावर उजवे वळण घेऊन वाहने पश्चिमेला पं. दिनदयाळ चौकाच्या दिशेने व उड्डाणपूल चढल्यावर उजवे वळण घेऊन पूर्वेला शहराच्या जाणारी वाहने, तसेच कोपर गावच्या दिशेने जाणारी वाहने उड्डाणपूल पश्चिमेला उतरल्यावर आमनेसामने येतात. परिणामी या भागात वाहतूक कोंडी होतेच, शिवाय त्याचबरोबर लहान-मोठे अपघातही होत असतात. हे टाळण्यासाठी उड्डाणपूलाच्या उतारावर उजवे वळण घेऊन पश्चिमेकडे व उड्डाणपूलाच्या चढणीवर उजवे वळण घेऊन पूर्वेला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करणे आवश्यक असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या पाहणीत समोर आले होते. या दृष्टीने वाहतूकीत बदल केले आहेत.
वाहतुकीच्या मार्गातील बदल काय?
कोपर उड्डाणपूलाच्या उतरणीवर उजवे वळण घेऊन दिनदयाळ रोडने पश्चिमकडे जाणाऱ्या वाहनांना उतरणीवर प्रवेश बंद असणार आहे. वाहने डावे वळण घेऊन कोपर रोडकडील कै. मिनाताई ठाकरे उद्यान येथून उजवे वळण घेऊन पुढे तेजस बिल्डिंग येथे उजवे वळण घेऊन एनएमएमटी बस स्टॉप येथे उजवे वळण घेऊन कोपर रोड येथे डावे वळण घेऊन पुढे इच्छीत स्थळी जातील.
कोपर रोडकडून उड्डाणपूल चढणीवर उजवे वळण घेऊन पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपूल उतरणीवर पश्चिमेला प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहने कोपर रोडने सरळ पुढे जाऊन जुनी डोंबिवली क्रॉस रोड, सेंट्रल हॉटेल शेजारी येथे यू टर्न घेऊन पूर्वेकडे इच्छीत स्थळी जातील.
जुन्या डोंबिवलीतील तेजस बिल्डींग येथून कै. मिनाताई ठाकरे उद्यानाच्या दिशेस कोपर रोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तेजस बिल्डींग येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहने तेजस बिल्डींग येथून डावे वळण घेऊन एनएमएमटी बस स्टॉप येथे उजवे वळण घेऊन कोपर रोडला डावे वळण घेऊन पुढे पश्चिमेला येऊन इच्छीत स्थळी जातील.
जुनी डोंबिवली रोडने देवी चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हॉटेल सेंट्रल पॅलेस येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहने पं. दिनदयाळ रोड व स्वामी विवेकानंद विद्यालय रोडने पुढे देवी चौकातून इच्छीत स्थळी जातील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे शहर वाहतूक नियंत्रण उपविभागाचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले.