

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीकडे मोठागाव-ठाकुर्ली जवळच्या सातपुल परिसरात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास धक्कादायक प्रकार दृष्टीक्षेपात आला. तब्बल १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. एकीकडे ही माहिती कळताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर दुसरीकडे वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून या संशयास्पद प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, या भागात राहणाऱ्या रहिवाशांना रस्त्याच्या कडेला आणि झाडी/झुडपांच्या बाजूला मोठ्या संख्येने मृत पक्षी इतस्ततः पडलेले आढळून आले. यातील दक्ष रहिवाशांनी तात्काळ गावातील इतरांना माहिती दिली. तसेच पोलिस आणि वनविभागालाही कळविण्यात आले. माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृत पक्ष्यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर सर्व पक्ष्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. अचानक इतक्या संख्येने आणि एकाच परिसरात तितर पक्षांचे मृतदेह आढळून आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हे पक्षी नैसर्गिक कारणाने मृत झाले की त्यांना विषबाधा झाली ? की कुणीतरी मुद्दाम मारून त्यांना निर्जनस्थळी आणून टाकले ? या सर्व शक्यता वनविभागाचे अधिकारी तपासून पाहत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे, वन्यजीव अधिकारी सोनल वळवी यांनी सुरू केला आहे.
हॉटेल वजा ढाबेवाल्यांवर संशय
खाडीच्या किनारी मोठागाव ते कुंभारखणपाडा पट्ट्यात बेकायदा हॉटेल वजा ढाबेवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा ठिकाणांकडे शासन/प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शाकाहारी/मांसाहारी पदार्थांसह दारूच्या बाटल्या देखील सर्रासपणे मिळतात. ओल्या पार्ट्या झोडणाऱ्यांमध्ये बड्या आसामींचा देखिल समावेश असतो. लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी तितर पक्षांचे मांस भक्षण केले असल्याने अशा खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी मासे आणि कोंबड्या/बकऱ्यांसह तितर पक्षांचेही बळी दिले जातात.
हे पक्षी दूरच्या जिल्ह्यांतून मागवले जातात. सद्या अनेक भागात कडाक्याची थंड असल्याने इतक्या दूरवरून आणताना प्रवासादरम्यान कोंबड्यांचा मृत्यू होतो. तितर पक्षी अतिशय मृदू असल्याने त्याच्यावर बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम होतो. यातूनच एकाच वेळी इतक्या संख्येने तितरांचा मृत्यू झाला असावा आणि विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचे मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिले असावेत, असा पक्षी तज्ञांकडून अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, परिसराची पाहणी करून काही संशयास्पद नमुने गोळा करण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. मात्र या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीसह संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.