काटई-बदलापूर महामार्गावर असलेल्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर आढळून आलेले ४७ अनधिकृत पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई करताना एमआयडीसीचा कर्मचारी गॅस कटरच्या साह्याने कनेक्शन कट करताना टिपलेले दृश्य Pudhari
ठाणे

Dombivli Water Theft | काटई-बदलापूर महामार्गावर पाणी चोऱ्यांचा भांडाफोड; एमआयडीसीने तोडली ४७ चोरटी कनेक्शन्स

मुख्य जलवाहिनीमधून सुरू होत्या लाखो लिटर पाण्याच्या चोऱ्या

पुढारी वृत्तसेवा

Katai Badlapur Highway Illegal Water Connections

डोंबिवली : काटई-बदलापूर महामार्गावरून जाणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला छिद्रे पाडून त्यातून पाण्याची करून टँकरद्वारे पाण्याची विक्री करणाऱ्या माफियांचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. एकीकडे एमआयडीसीने या जलवाहिनीला छिद्रे पाडून केलेली तब्बल ४७ चोरटी कनेक्शन्स तोडून टाकली आहेत.

तर दुसरीकडे असले गोरखधंदे करणाऱ्या टँकरमाफीयांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप टँकर माफियांची नावे समोर आलेली नसल्याने पोलिसांच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित टँकर माफियांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

 एमआयडीसी प्रशासनाने उशिरा का होईना पण कटाई ते नेवाळी दरम्यानच्या पट्ट्यातील तब्बल ४७ पाण्याची कनेक्शन तोडून टँकरमाफीयांचे कंबरडे मोडले आहे. या कनेक्शनच्या माध्यमातून एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून सर्रास पाण्याची चोरी सुरू असल्याचे उघड झाले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून पाणी चोरी सुरू असताना एमआयडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय करत होते ? मुख्य जलवाहिनीवर इतक्या मोठ्या संख्येने चोरीची कनेक्शन सुरू असताना प्रशासनाच्या ही बाब लक्षात कशी आली नाही ? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

पाणी चोरीच्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून केवळ अनधिकृत कनेक्शन तोडण्यापुरतीच कारवाई न करता या चोऱ्यांमागील सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविणारे मुख्य सूत्रधार, टँकर चालक/मालक आणि संबंधित सर्वांना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सरकारी कागद रंगविण्याचे काम केले आहे. आता प्रत्यक्षात पाणी चोरांची शृंखला पोलिस चव्हाट्यावर कशी आणि कधी आणतात ? याकडे पाण्यासाठी दिवस/रात्र टाहो फोडणाऱ्या रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT