

Dombivli Water Supply
डोंबिवली : डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची खबर असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून डोंबिवली पूर्व विभागाचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी तब्बल १६ तास बंद ठेवण्यात येणार आहे. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला खंबाळपाडा परिवहन आगाराजवळ मोठी गळती लागली आहे.
ही गळती थांबविण्यासाठी तातडीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली आहे. केडीएमसीच्या १५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागाला ११०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या जलवाहिनीला परिवहन आगाराजवळ गळती लागल्याने ती तात्काळ दुरूस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी तब्बल १६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा कठोर निर्णय महापालिकेने घेतला आहे.
दुरूस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनी होणारी गैरसोय टाळण्याकरिता आवश्यक तेवढा पाणीसाठा आधीच करून ठेवावा आणि पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी केले आहे.