Dombivli News : डोंबिवली-दिव्यातून थेट मुंबईसाठी लोकल सोडा : रवींद्र चव्हाणांची मध्य रेल्वे प्रशासनाकडे आग्रही मागणी

४८ प्रवासी संघटनांच्या मागण्यांवर सीएसएमटी येथे खलबते
Dombivli News : डोंबिवली-दिव्यातून थेट मुंबईसाठी लोकल सोडा : रवींद्र चव्हाणांची मध्य रेल्वे प्रशासनाकडे आग्रही मागणी
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीसह मुंबई आणि ठाणे परिसरातील लाखो लोकल प्रवाशांच्या प्रलंबित मागण्या व दैनंदिन समस्यांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक हिरेश मीना यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आठवड्याभरापूर्वी कल्याण-डोंबिवलीतील ४८ रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या; त्याचाच पाठपुरावा म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत प्रवासी संघटनांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांकडे आमदार चव्हाण यांनी महाव्यवस्थापकांचे लक्ष वेधले. यामध्ये गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे लिंकचे काम तातडीने पूर्ण करणे, बदलापूर-कर्जत आणि कल्याण-कसारा मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांना गती देणे, ठाणे-कर्जत व ठाणे-कसारा दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष शटल सेवा सुरू करणे, आधुनिक सिग्नल यंत्रणा लागू करून दोन गाड्यांमधील अंतर (हेडवे) कमी करणे, दिवा-वसई-पनवेल मार्गावर थेट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि कल्याण जंक्शनसह सीएसएमटीपर्यंत पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे या मागण्यांचा समावेश होता.

त्याचप्रमाणे ऐन गर्दीच्या वेळेत डोंबिवली आणि दिवा स्थानकांतून थेट मुंबईसाठी लोकल गाड्या सोडण्यात याव्यात; तसेच प्रवाशांची सुरक्षा, फलाटांवरील गर्दीचे व्यवस्थापन आणि सातत्याने उशिरा धावणाऱ्या गाड्यांचा प्रश्न या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.

महाव्यवस्थापकांकडून सकारात्मक प्रतिसाद

लाखो चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढण्याची सूचना आमदार रवींद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला केली. रेल्वे प्रशासनाकडून या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असा सकारात्मक प्रतिसाद महाव्यवस्थापक हिरेश मीना यांनी दिल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. यामुळे लवकरच प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news