Kalyan Hit and Run Case pudhari photo
ठाणे

Kalyan Hit and Run Case : आमदाराचे स्टिकर असलेल्या मर्सिडीजने चिरडून मृत्यू

कल्याणातील हिट अँड रन प्रकरणाला कलाटणी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या २५ वर्षीय सुनील कोळी या तरुणाचा भरधाव मर्सिडीज कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याच्या हिट अँड रन प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. खडकपाडा पोलिसांनी कारवाई करत कार चालकाला अटक केली असून आमदाराचा स्टिकर लावलेली मर्सिडीज कार देखील जप्त केली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास सुनील कोळी हा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. यावेळी भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीज कारने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सुनील हवेत उडून रस्त्याच्या कडेला उभारलेल्या मंडपाच्या खांबामध्ये जाऊन अडकला आणि जागीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातानंतर मानवतेचे दर्शन घडवण्याऐवजी मर्सिडीज चालकाने जखमी अवस्थेत पडलेल्या सुनीलला तसेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.

यातील फुटेजच्या आधारे पोलिसांनी अपघातात वापरलेली मर्सिडीज कार शोधून काढली आणि चालक ओमिल अनिल गायकर याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी एम एच ०५/ई व्ही/३२०० क्रमांकाची मर्सिडीज कार जप्त केली आहे. ही कार कुणाच्या नावाने आहे? कुणाच्या मालकीची आहे? याचाही पोलिस तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT