Crime News Pudhari
ठाणे

Crime News: वंचित आघाडी जिल्हा संघटकाच्या पित्याची जमावाकडून हत्या

डोंबिवलीजवळच्या घारीवली गावात रक्तरंजित थरार; लोखंडी रॉडच्या प्रहाराने जागीच मृत्य

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवलीजवळील घारीवली गावठाण परिसरात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रक्तरंजित घटना घडली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहूल जाधव यांचे 60 वर्षीय वडील बामा दूंदा जाधव यांची सशस्त्र जमावाकडून लोखंडी रॉडने हल्ला करून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तपासचक्रांना वेग देऊन आत्तापर्यंत तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून इतर मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता 14 जणांच्या सशस्त्र टोळक्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहूल जाधव यांच्या कुटुंबावर हल्ला केला. हा वाद सोडविण्यासाठी मधे पडलेले राहूल यांचे वडील बामा जाधव यांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास जाधव कुटुंबीय जेवण करत होते.

इतक्यात दिनेश यास साहिल जाधव याने फोन करून धमक्या देत घराबाहेर बोलावले. दिनेश हा जेवणाच्या ताटावरून उठून घराबाहेर असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानाजवळ गेला. त्यांनतर तो अवघ्या 5 मिनिटांत घाबरून पळत घरामध्ये आला. त्यावेळी त्याचे अंगावरील कपडे हे फाटलेले होते. काय झाले ? असे विचारणा केली असता त्याने कोळेगावात राहणारा ओळखीचा साहिल सुखदेव जाधव, मयुर कमलाकर पाटील, विनोद व इतर 7 ते 8 जणांनी मिळून मारहाण केल्याचे सांगितले.

साहिलच्या सोबत निशा सुखदेव जाधव, जयवंती मोतीराम जाधव व निशाची मुलगी देखिल होती. हे ऐकून जाधव कुटुंबीय घराबाहेर पडले असता हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण सुरू केली. हे पाहताच आपल्या मुलाला वाचविण्यासाठी मधे पडलेले बामा जाधव यांच्यावरही हल्लेखोर टोळक्याने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडच्या साह्याने जोरदार प्रहार केले.

डोक्यास जबर दुखापत झाल्याने बामा जाधव यांचा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत निपचीत पडले. वडिलांची हालचाल बंद झाली तरीही हल्लेखोरांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरूच ठेवली होती. आज एकाला मारले...तुम्हा सर्वांना मारणार...काय करायचे ते करा...अशा धमक्या देत हल्लेखोरांनी तेथून पळ काढल्याचे राहूल जाधव यांनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे.

रक्तबंबाळ झालेल्या बामा जाधव यांना काटई येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तात्काळ हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापुर्वीच मृत घोषित केले. या संदर्भात घरीवली गावातील जाधव वाडीत राहणारे राहूल बामा जाधव (34) यांच्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी खुनाच्या कलमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम, तसेच अनुसूचित जाती/जमाती अन्याय व अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये 14 मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता वाढली असतानाच मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बामा जाधव यांचा खासगी हॉस्पिटलमध्ये ठेवलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलला पाठवून देण्यात आला.

3 महिलांसह अल्पवयीन मुलगा ताब्यात

पोलिसांनी आतापर्यंत या हत्याकांडाशी संबंधित असलेल्या 3 महिला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित आरोपी मयूर पाटील आणि विनोद यांच्यासह इतर मारेकऱ्यांना पोलिस जंग जंग पछाडत आहेत. पोलिसांनी खुनासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्य की इतर काही वाद ? या दिशेने पोलिस तपास करत आहेत. आरोपींची ओळख पटली असून लवकरच मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT