

ठाणे : “आपल्या मुलीचे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना भविष्यातील गंभीर आजारांपासून, विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी ‘एचपीव्ही’ लस हे प्रभावी सुरक्षा कवच आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सनियंत्रण समितीची बैठक पार पडली, यावेळी शिंदे बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींना लसीकरणाच्या कक्षेत आणण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.
14 वर्षे पूर्ण झालेल्या व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना ही लस विनामूल्य देण्यात येत असून, शाळा व आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे. भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.
हा कर्करोग प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. या विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण मिळवण्यासाठी ‘एचपीव्ही’ लस अत्यंत प्रभावी मानली जाते. त्यामुळे ही लस केवळ प्रतिबंधात्मक उपाय नसून भविष्यातील जीवघेण्या आजाराविरोधातील महत्त्वाचे संरक्षण कवच ठरते. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी ही मोहीम मुलींच्या दीर्घकालीन आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, “एचपीव्ही लसीकरण ही मुलींच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे आणि या मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे.”
लस सुरक्षीत: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे 30 हजार महिलांचे ‘एचपीव्ही’ लसीकरण करण्यात आले असून कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. 2006 पासून जगभरात 50 कोटींहून अधिक महिलांनी ही लस घेतली असून तिची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना नुसार या लसीचा प्रजननक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
दरवर्षी 78 हजार नवे रुग्ण:आयसीएमआर च्य 2024 च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 78 हजार 419 नवीन रुग्ण आढळतात, तर 42,392 महिलांचा मृत्यू गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होतो. या पार्श्वभूमीवर ‘एचपीव्ही’ लसीकरण ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यावश्यक उपाययोजना ठरते.
‘एचपीव्ही’ लसीकरण का महत्त्वाचे?
विषाणूमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो
लसीकरणामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो
14-15 वयोगटातील मुलींमध्ये लस अधिक प्रभावी
एकच डोस (क्वाड्रीव्हॅलंट लस) पुरेसा संरक्षण देऊ शकतो
मासिक पाळी दरम्यानही लस सुरक्षित