

भाईंदर : राज्याचे परिवहन मंत्री तथा ओवळा-माजिवडा विधानससभा क्षेत्राचे आ. प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपच्या जागेबाबत खोट्या तसेच बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्राचे भाजप आ. नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. मेहता यांनी देखील त्या नोटिसीला प्रत्युत्तर म्हणून थेट परिवहन मंत्र्यांनाच कायदेशीर नोटीस बजाविल्याने या दोंघांमधील वाद आणखी उफाळून आल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या राजकीय वादामुळे शहर विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विहंग ग्रुपकडून ठाण्याच्या भायंदरपाडा येथील जमिनीवर गृहप्रकल्प साकारण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या गृहप्रकल्पाच्या समोरील काही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. हि बांधकामे तोडण्यामागे तेथील जमीन बळकाविण्याचा प्रकार असल्याचा आरोप पिडीतांसह आ. नरेंद्र मेहता यांनी थेट परिवहन मंत्र्यांवर केला.
त्यांनी संबंधित कारवाई बेकायदेशीर तसेच मनमानी पद्धतीने केल्याचा आरोप करीत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विहंग ग्रुपचा प्रकल्प संबंधित जमीन विहंग ग्रुपच्या कायदेशीर ताब्यात असून त्यावरील गृह प्रकल्पाचे मंजूर आराखडे व परवानग्यांनुसार त्या जमिनीचा विकास करण्याचा अधिकार कंपनीला असल्याचे विहंग ग्रुपने मेहता यांना बजाविण्यात आलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
असे असतानाही मेहता यांनी महसूल व ठाणे महापालिका अभिलेखातून तसेच संबंधित प्राधिकरणांकडून वस्तुस्थिती आणि कायदेशीर स्थितीची कोणतीही पडताळणी न करता कंपनीविरोधात खोटे व बदनामीकारक विधाने केली. खोटी व बदनामीकारक विधाने मेहता यांनी प्रसार माध्यमांसमोर व समाजमाध्यमांवर करून जाणीवपूर्वक प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीचे चुकीचे चित्रण केल्याचे मेहतांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
त्याला प्रत्युत्तर म्हणून मेहता यांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यात 7 एप्रिल रोजी मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांसमोर मिरा-भाईंदरमधील 30 टक्के जमीन आपल्या मालकीची असल्याचे विधान सरनाईक यांनी केले. हे विधान पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आणि कोणत्याही वस्तुस्थितीवर किंवा कायदेशीर आधारावर केले नसल्याचा दावा मेहता यांनी नोटिशीत केला आहे.
तसेच सेव्हन-इलेव्हन कंपनी हि आपल्या मालकीची नसून त्याचे आपण केवळ भागधारक आहोत मालक नाही. सरनाईक यांनी केलेल्या विधानांमधील असत्यता आणि त्यांचे संभाव्य परिणाम यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरनाईक यांना सावध केले. असे असतानाही त्याकडे सरनाईक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांनी मेहता यांच्याविरोधात बदनामीकारक विधाने करणे सुरूच ठेवले. यामुळे मेहता यांची प्रतिष्ठा, मानसन्मान तसेच सार्वजनिक प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप मेहता यांनी सरनाईक यांच्यावर केला आहे.
शहरवासीयांमध्ये नाराजीचा सुर
यावर नाराज शहरवासीयांनी या दोन्ही लोकप्रतिनिधींना, स्वतःभोवती वलयांकित केलेले आरोप, प्रत्यारोप तसेच राजकीय कुरघोडी तात्काळ थांबवून शहराच्या विकासाकडे अधिकाधिक लक्ष द्यावे व शहराचा विकास साधावा, असा सल्ला दिला आहे.