डोंबिवली : डोंबिवलीतील प्रसिद्ध धावपटू तथा राष्ट्रीय फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप हे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जायबंदी झाले आहेत. रस्त्यावरून दुचाकीने जात असताना एका भरधाव कारने त्यांना आणि त्यांच्या मुलाला धडक देऊन फरफटत नेले. या अपघाताला जबाबदार असलेला कारचालक घटनेनंतर पसार झाला असून त्याला पकडण्यात अपयशी ठरल्याने पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
लक्ष्मण गुंडप हे डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या महात्मा गांधीनगर परिसरात राहतात. ते नामांकित धावपटू आणि राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉलपटू म्हणून ओळखले जातात. अनेक उदयोन्मुख धावपटूंना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांनी अनेक खेळाडू तयार केले आहेत. मात्र त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी बाका प्रसंग उद्भवला आहे.
लक्ष्मण गुंडप आणि त्यांचा मुलगा जिमखाना क्रीडांगणावर जाण्यासाठी निघाले होते. मुलगा सायकल चालवत होता, तर गुंडप दुचाकीवर होते. इतक्यात विरूद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव कारने प्रथम त्यांच्या मुलाला आणि नंतर गुंडप यांना धडक दिली. धडकेनंतर कारचालकाने त्यांना 15 ते 20 मीटर दूरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या लक्ष्मण गुंडप यांना उपचारांसाठी मदत करण्याऐवजी कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांनी जखमी गुंडप आणि त्यांच्या मुलाला रूग्णालयात दाखल केले. या अपघातात गुंडप यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
उपचाराचा खर्च वाढण्याची शक्यता
गुंडप यांच्या पायाच्या उपचारावर आत्तापर्यंत 5 लाख रूपये खर्च झाला आहे. उपचाराचा हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. इतका मोठा क्रीडापटू जायबंदी झाला आहे. तथापी पुढारीपणाला चटावलेला एकही राजकारणी त्याच्यापर्यंत पोहोचला नाही. डॉक्टरांनी गुंडप यांना पूर्णपणे बेड रेस्ट अर्थात विश्राम करण्यास सांगितले आहे. कमीतकमी 10 महिने तरी त्यांना चालता येणार नाही. या कालावधीत कुणालाही प्रशिक्षण देऊ शकणार नाहीत. परिणामी आपले सामाजिक कार्य थांबल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी
रस्त्यांवर बेदरकारपणे वाहने चालविली जातात. रस्त्यावर अनेक मुले सरावासाठी धावत असतात. त्यांचाही अशाच प्रकारे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या घटनेतील बेदरकार कारचालकाचा शोध घेऊन लवकरात लवकर अटक करावी. त्याला कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून रस्त्यावरून चालणार्या पादचारी वा धावपटूंसारख्या कुणाचीही मुलाहिजा न ठेवता बेफाम वाहन चालविणार्यांनाही अद्दल घडेल, याकडे लक्ष्मण गुंडप यांनी लक्ष वेधले आहे.