डोंबिवली : परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलिसी फणा काढल्यानंतर काही दिवस पश्चिम डोंबिवलीतील गुंडगिरीला चाप बसला आहे. तथापी गुंडांनी अद्याप नांगी टाकली नसल्याचे एका प्रकारातून दिसून येत आहे. एका पंप चालकावर रात्रीच्या वेळी नाईलाजाने आपला पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी अशी डोंबिवलीची ओळख जरी असली तरी सध्याच्या घडीला वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची ओळख पुसट होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, लुटमारीच्या घटनांसह रात्रीच्या सुमारास मद्यधुंद तरूणांच्या हैदोसामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पेट्रोल पंपावर लागलेला फलक बरेच काही सांगून जात आहे. पश्चिमेतील राजू नगर/गणेश नगर परिसरात सुरेश मोरे यांचा हा पेट्रोल पंप आहे. सुरेश मोरे हे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे चुलत भाऊ आहेत. सुरुवातीपासून या पेट्रोल पंपावर २४ तास इंधन मिळण्याची सुविधा असायची. मात्र आता रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंपावर लावलेल्या बॅनरमुळे हा सारा प्रकार उजेडात आला आहे.
रात्रीच्यावेळी पंपावर इंधन भरण्यासाठी येणारे काही ग्राहक तेथील कर्मचाऱ्यांशी विनाकारण हुज्जत घालून त्रास देतात. दारू ढोसून काही बदमाश कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याने हा निर्णय घेतल्याचा बॅनर या पेट्रोल पंपावर लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे सुसंस्कृत डोंबिवलीत वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरली आहे.
या बॅनरवर पंप बंद ठेवण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी येणारे मद्यधुंद तरूण पंपावरील कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देतात. कर्मचाऱ्यांना शिविगाळ करणे, त्यांना मारहाण करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाढत्या कंटाळून हा निर्णय घेतल्याचे पंपचालक सुरेश मोरे यांचे म्हणणे आहे.