डोंबिवली : डोंबिवलीतील सतरा वर्षीय तरूणीचा ती शिक्षण घेत असलेल्या कॉलेजपासून घर आणि घरापासून कॉलेजपर्यंत गेल्या पाच महिन्यांपासून पाठलाग करणाऱ्या प्रेमविराला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन कोठडीचा रस्ता दाखवला आहे. माझ्याशी फ्रेंडशिप (मैत्री) केली नाहीस तर हाताची नस कापून आत्महत्या करीन, अशी या विद्यार्थीनीला धमकी देणारा स्वामी राठोड (१९) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. कल्याण न्यायलयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार तरूणी आणि अटक करण्यात आलेला आरोपी स्वामी राठोड हे दोघे एकमेकांचे परिचित असून एकाच भागात राहणारे आहेत. तक्रारदार तरूणी डोंबिवलीतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. स्वामी राठोड हा या तरूणीला रस्त्यात गाठून मैत्रीची गळ घालत होता. तथापी तरूणी दाद देत नसल्याने स्वामी चिडला होता. ही तरूणी घरातून कॉलेजला जायला निघाली की स्वामी पाठलाग करायचा. रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न करायचा. मात्र तरूणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. पाठलाग केल्यास आणि रस्त्यात अडविल्यास तुझी तक्रार करीन, अशी तिने त्याला तंबी दिली होती. तरीही तो दाद देत नव्हता.
गेल्या ५ महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासाला ही तरूणी कंटाळली होती. त्यातच त्याने हाताची नस कापून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने ही तरूणी अधिकच घाबरली होती. हा सारा प्रकार आपल्या आई/वडिलांना सांगितला. या त्रासातून सुटका होण्यासाठी तरूणीने आई/वडील आणि निकटवर्तीयांसह टिळकनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सापळा लावून स्वामी राठोड याला अटक केली. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी एक पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले.