

डोंबिवली : एकीकडे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोहीम तीव्र केली असतानाच रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनीही कारवायांना वेग दिला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात शालिमार एक्स्प्रेसमधून उतरलेल्या गांजा तस्कराला जेरबंद करून त्याच्याकडून प्रवासी बॅगेत लपविलेला साडेआठ किलो वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बल आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे.
शिराज खलील खान (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी आहे. लोहमार्ग कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोलकात्याहून मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे येणाऱ्या शालिमार एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका बदमाशाकडे अंमली पदार्थांचा साठा असल्याची खबर कल्याणच्या रेल्वे सुरक्षा बल आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. ही एक्स्प्रेस कल्याणात येताच आरपीएफ आणि जीआरपीने बोगीत घुसून संशयित प्रवाशाचा माग काढला. पोलिसांना पाहताच त्या प्रवाशाची घाबरगुंडी उडाली.
पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता सदर बॅगेत गांजा आढळून आला. चौकशी दरम्यान स्वतःचे नाव शिराज खान सांगणाऱ्या या बदमाशाने गांजाचा साठा ओडिसा येथून आणला असून भिवंडीमध्ये पोहचविणार असल्याची कबूली दिली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रयागराजमध्ये राहणारा हा बदमाश तेथे वेल्डिंगचे काम करतो. हा गांजा ओडिसातून कुणाकडून घेतला ? भिवंडीत तो कुणाला विक्री करणार होता ? यापूर्वी त्याच्या विरोधात अन्य पोलिस ठाण्यांत काही गुन्हे दाखल आहेत का ? याचा चौकस तपास कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.