डोंबिवली : महसूल दप्तरी जमिनीची नोंद करण्यासाठी अज्ञात इसमाने चक्क राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केला आहे. शिवाय मंत्रालयातील महसूल विभागात असलेल्या एका विशेष कार्य अधिकाऱ्याच्या पत्राने आदेश काढला आहे. या पत्रावरील सही शिक्काही बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा नोंदवून चौकस तपास सुरू केला आहे.
महसुली गाव असलेल्या मौजे आयरेशी संबंधित पश्चिमेकडे कोपर रोडला शास्त्रीनगर रूग्णालय आहे. या रूग्णालयाच्या सर्व्हे नं. ३४/५, ३९/११, ४०/१, ८६/२ या जमिनीच्या मालकी हक्काच्या वादासंदर्भात महसूल विभागाकडे दावे दाखल आहेत. हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दाखल आहे. या प्रकरणातील अर्जदार अर्थात दावेदारांना महसूल मंत्र्यांकडे असलेल्या शास्त्रीनगर रूग्णालयाजवळील जमिनीबाबत एक आदेश काढल्याची माहिती मिळाली.
जमिनीची सुनावणी प्रलंबित असताना आदेश कुणी काढला ? असा प्रश्न अर्जदाराला पडला. तक्रारदाराला संशय आल्याने त्याने तशी तक्रार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात केली. स्थानिक पातळीवर केलेल्या चौकशीत तो आदेश महसूल मंत्री, तेथील तत्कालीन विशेष कार्य अधिकारी कुंदनकुमार सोनवणे यांच्या बनावट सही/ शिक्याने काढल्याचे समोर आले.
या आदेशाचा क्रमांक महसूल मंत्री कार्यालयातील नोंदीशी विसंगत असल्याचेही आढळून आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कल्याणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार महसूल विभागाचे सहाय्यक लक्ष्मण नांगरे यांनी या प्रकरणी आधी रामनगर पोलिस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. तथापी पश्चिम डोंबिवलीतील कोपर रोडला असलेल्या केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयाजवळच्या जमिनीशी संबंधित असल्याने हे प्रकरण चौकशीसाठी विष्णूनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे आणि त्यांचे सहकारी चौकस तपास करत आहेत.