डोंबिवली : कुख्यात तथा कथित गँगस्टर नन्नू शहा याचा पुतण्या सूरज शहा याने कल्याणातील बिल्डरला १५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावले आहे. १५ पेट्या (लाख) टाक...नाहीतर नाहीतर ढगात पाठवीन, अशी धमकी देणाऱ्या खंडणीबहाद्दर सूरजला अटक करण्यात आली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, या खंडणीखोराला कल्याण न्यायालयाने ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे खंडणीसाठी धमकावून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या या घटनेमुळे बिल्डर लॉबीत एकच खळबळ माजली आहे.
कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक किरण निचळ यांनी कल्याण पश्चिमेकडील जिजाऊ सहकारी सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम घेतले आहे. याच इमारतीच्या जुन्या बांधकामाचे डिमॉलिशन आणि मटेरियल पुरविण्याचे काम स्वतःला देण्यासाठी गँगस्टर नन्नू शहा याचा पुतण्या सूरज शहा याने त्यांना धमकावले. ३ सप्टेंबर रोजी सूरज याने बिल्डर निचळ यांना फोन करून मी नन्नू शहाचा पुतण्या बोलतोय, अशी ओळख सांगितली. पहिल्या फोनमध्ये सूरजने निचळ यांना साईटवरील डिमॉलिशन आणि मटेरियल सप्लायचे काम स्वतःलाच देण्याचे फर्मावले. बिल्डर निचळ यांनी प्रतिसाद न दिल्याने ५ मिनिटांनी सूरजने पुन्हा फोन केला आणि थेट १५ लाख रूपयांची मागणी केली. एकतर मला काम दे, नाहीतर १५ लाख रूपये दे. अन्यथा तुला खल्लास करून टाकेन, अशी धमकी त्याने दिली.
या धमक्यांना घाबरून बिल्डर किरण निचळ यांनी तातडीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली सूरज शहा याला अटक केली. कुख्यात तथा कथित गँगस्टर नन्नू शहा याचे नाव वापरून त्याचा पुतण्या सूरज याने आणखी किती लोकांना अशा प्रकारे धमकावून खंडण्या उकळल्या आहेत, याचा पोलिसांनी चौकस तपास सुरू केला आहे.