डोंबिवली : धंदा करायचा असेल तर महिन्याला हफ्ता द्यावा लागेल, असे धमकावून भंगार दुकानदाराकडे खंडणीची मागणी करणाऱ्या गावगुंडांची दहशत चव्हाट्यावर आली आहे. हा प्रकार डोंबिवली जवळच्या देसलेपाडा परिसरात घडला आहे. हप्ता देण्यास इन्कार करणाऱ्या दुकानदाराला गावगुंडांनी बेदम झोडपून काढले. हा सारा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकीकडे भयभीत दुकानदाराने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे, तर दुसरीकडे या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देसलेपाड्यात पंकज मौर्या याचे भंगाराचे दुकान आहे. रविवारी १८ जानेवारी रोजी संध्याकाळी पंकजचे वडिल विनोद मौर्या दुकानासमोर बसले होते. दुकानातील काही भंगार दुकानाबाहेर ठेवले होते. विनोद यांच्या ओळखीचा सागर काटेकर नामक तरूण त्याठिकाणी आला. भंगारचे सामान दुकानाच्या बाहेर का ठेवले आहे ? असे त्या तरूणाने विचारले. यावर विनोद यांनी हे सामान दुसरीकडे न्यायचे आहे, त्यासाठी गाडी बोलाविली असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर संतापलेल्या सागर आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून विनोद यांना झोडपायला सुरूवात केली.
हे सर्व सुरू असतानाच विनोद यांचा मुलगा पंकज त्याठिकाणी आला. हल्लेखोरांच्या तावडीतून पंकजने पित्याला सोडविले. त्यानंतर दोघे बाप-लेक मापनाडा पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र आरोपींवर ज्या प्रकारची कारवाई करायला हवी तशी ठोस कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नसल्याचा आरोप पंकज मौर्या याने केला आहे. पंकजच्या म्हणण्यानुसार सागर कोटकर हा काही दिवसांपूर्वी दुकानात आला होता. दर महिन्याला हप्ता दिला पाहिजे. नाही दिला तर धंदा करू देणार नाही, अशी धमकी त्याने दिली. ठोस कारवाई करून आरोपींची दहशत मोडीत काढली पाहिजे. असे प्रकार पुन्हा घडू नये, याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे पंकजने सांगितले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.