

डोंबिवली : मकर संक्रांतींच्या काळात चिनी बनावटीचा काचदार असलेला घातक मांजा वापरू नये, असे आवाहन केले जात असताना, तसेच अशा मांजावर बंदी असताना देखिल काही दुकानदार अशा प्रकरच्या मांजाची विक्री करून पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण-डोंबिवलीत मकर संक्रांतीनिमित्त उडविण्यात येत असलेल्या पतंगींच्या घातक चिनी मांजाच्या काचदार दोऱ्याला अडकून बगळा, गव्हाळ घुबड, कबतूर असे सहा पक्षी अडकून जखमी झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पॉज अर्थात प्लॅन्ट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या स्वयंसेवकांनी एकत्रित बचाव कार्य करून मांजात अडकलेल्या सहाही पक्ष्यांची सुटका केली. उपचार करून या पक्षांना त्यांच्या अधिवासात सोडून देण्यात आल्याची माहिती पाॅज संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. निलेश भणगे यांनी दिली.
मकर संक्रांतींच्या काळात घातक चिनी काचदार मांजा वापरू नये आणि या मांजावर बंदी असताना काही दुकानदार अशा प्रकराचा मांजा विक्री करून पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले. पतंग उडवताना मांजा इमारतीवरील पत्र्याचा निवारा, झाडांच्या फांद्या, इमारतीच्या खिडक्यांना अडकतो. पतंग उडविणारा पतंग काढण्यासाठी मांजाला हिसके देत असताना मांजा तुटून त्याच भागात लोंबकळत राहतो. दिवसा-रात्रीच्या सुमारास आकाशात विहंग करणाऱ्या पक्षांच्या मानेला किंवा पायात दोरी अडकून हे पक्षी त्या मांजात अडकून लोंबकळत राहतात. अशा घातक चिनी मांजाची विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिस दरवर्षी मकरसंक्रातीपूर्वी छापे टाकून मांजे जप्त करतात. यावेळी महापालिका निवडणुकांचा माहोल असल्याने पोलिस सर्वत्र बंदोबस्तात व्यस्त असल्याने अशाप्रकारची कारवाई म्हणावी तशी करता आली नाही. गेल्यावर्षी कल्याण-डोंबिवलीतील अनेक दुकानांवर छापे मारून पोलिसांनी घातक चिनी नायलाॅन धाग्याचे काचदार मांजे जप्त केल्याची आठवण पक्षी मित्रांनी करून दिली.
पतंग उडविण्याच्या घातक चिनी मांजावर बंदी असल्याने पक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी होईल, असे वाटले होते. मात्र असे प्रकार थांबत नसल्याचे दिसत नाहीत. उलट यावेळी गेल्या पाच दिवसांत कल्याण-डोंबिवलीच्या विविध भागातून दररोज तीन-चार पक्षी पतंगाच्या मांजात अडकून लोंबकळत ते जखमी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. ही माहिती मिळताच पाॅज संस्थेच्या स्वयंसेवकांनी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. उंच ठिकाणी पक्षी अडकल्याने अग्निशमन विभागाची शिडी यासाठी महत्वाची असते. त्यामुळे अग्निशमन विभागाचे जवान आणि पाॅज संस्थेच्या स्वयंसेवकांनी अशा अडकलेल्या एक बगळा, एक गव्हाळ घुबड आणि चार कबुतरांची सुटका केली आहे. जखमी पक्ष्यांच्या पाय, पंखांना जखमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर उपचार करून मग हे पक्षी त्यांच्या अधिवासात सोडण्यात आल्याचे पाॅजचे डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.
पतंंग उडविताना मांजात अडकून पक्षी जखमी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आमच्या जवानांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे घटनास्थळी जाऊन मांजात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका केल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.
मकर संक्रात किंवा इतर दिवशी पतंग उडवताना कापडी किंवा नैसर्गिक धाग्यांचा वापर करा. चिनी बनावटीच्या मांजाचा वापर पूर्ण टाळावा. अशा काचेच्या मांज्यामुळे निरागस पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यावेळीही आम्ही मांजाने पक्षी जखमी झाल्याच्या प्राप्त माहितीप्रमाणे पक्ष्यांची अग्निशमन जवानांच्या साह्याने सुटका केल्याचे पॉज डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.