

डोंबिवली : कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसां गुंगारा देत गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांच्या मुसक्या आवळण्यात कल्याण क्राईम ब्रँचला अखेर यश आले आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावात सापळा रचून या दोन्ही अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही यापूर्वीच 'फरार' घोषित केले होते.
विनोद जगन्नाथ कांबळे आणि नागसेन ऊर्फ नागेश जगन्नाथ कांबळे (रा. वालधुनी, कल्याण-पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तीन वर्षांपूर्वी कल्याणमध्ये एकावर प्राणघातक सशस्त्र हल्ला करून या दोघांनी परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही पोलिसांना चकवा देत होते. आरोपी वारंवार आपला ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. हजर न झाल्यामुळे कल्याण न्यायालयाने १७ जानेवारी २०२३ रोजी त्यांच्या विरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी आपल्या अनुभवाचा कस पणाला लावून या गुंडांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, पोलीस शिपाई गोरक्ष शेकडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हे दोघे भाऊ भिवंडीतील काल्हेर गावात लपून बसले आहेत. माहिती मिळताच क्राईम ब्रँचने तातडीने चक्र फिरवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किरण भिसे आणि पथकाने काल्हेर गावातील हळदीराम गोडाऊनमागील सी.जी. पार्क बिल्डिंगजवळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या विनोद आणि नागेश या दोन्ही बदमाशांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर दोघांनाही पुढील कार्यवाहीसाठी महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना ३ वर्षांनंतर गजाआड करणाऱ्या या पथकाचे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.