Dombivli Civic Issues Pudhari
ठाणे

Dombivli Civic Issues: डोंबिवली रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर खड्डे; नागरिकांकडून अपघाताची भीती होतेय व्यक्त

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले हे काम संथ गतीने सुरू असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली शहर: ‌‘स्मार्ट सिटी‌’च्या वल्गना करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रशासन डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ करत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील वर्दळीच्या रस्त्यावर गटार बांधकामासाठी खोदण्यात आलेले खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले हे काम संथ गतीने सुरू असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. उघड्या गटारांवर केवळ लाकडी फळ्या टाकून पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागत आहे. गर्दीच्या वेळी या फळ्यांवरून चालताना तोल जाऊन अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय, या उघड्या खड्ड्यांमध्ये सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका बळावला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसराची अवस्था अधिकच बिकट झाली असून, स्वच्छतेच्या नियमांकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या परिस्थितीचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसत आहे. रस्त्यावरील अडथळ्यांमुळे ग्राहकांची ये-जा कमी झाली असून, ‌‘दररोज भीतीच्या वातावरणात व्यवसाय करावा लागत आहे,‌’ अशी प्रतिक्रिया काही दुकानदारांनी दिली.

रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक

स्थानक परिसरात पथदिव्यांचा अपुरा प्रकाश असल्याने रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसून येत नाहीत. याठिकाणी कोणतेही सूचना फलक लावलेले नसल्याने प्रवाशांना अंधारात खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, गंभीर दुखापतींचा धोका अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा संभाव्य अपघातांची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT