दिवा : दिवा रेल्वे स्टेशनजवळ गुरुवारी दुपारी 12:14 वाजताच्या सुमारास कंटेनर केबिन व कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती शीळ अग्निशमन केंद्रामार्फत आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान 1 फायर वाहन व 1 रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी देखील घटनास्थळी तत्काळ उपस्थित राहून मदतकार्य सुरू केले.
सदर कंटेनर केबिन ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे समजते. केबिनमधील भंगार साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेने केलेल्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे विझविण्यात आली असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आग लागण्याचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.