Local Train Pudhari
ठाणे

Local Train Safety: मुंब्रा रेल्वे सुरक्षेला बळ; स्वयंचलित दरवाजांचा मार्ग मोकळा

नव्या लोकलमध्ये यंत्रणा इन-बिल्ट, जुन्या गाड्यांमध्ये रेट्रोफिटिंग

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: दिवा-मुंब्रा-कळवा रेल्वे पट्ट्यात लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी स्वयंचलित दरवाजांच्या दिशेने रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे.

स्थानिक प्रवासी आणि सामाजिक संघटनांनी सातत्याने केलेल्या संघर्षाला अखेर यश आले असून, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेत महत्त्वपूर्ण तांत्रिक बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने जाहीर केला आहे.

आगामी लोकल गाड्यांमध्ये कारखान्यातूनच स्वयंचलित दरवाजा बंद करणारी यंत्रणा बसवण्यात येणार असून, सध्या धावत असलेल्या लोकलमध्येही रेट्रोफिटिंगद्वारे ही सुविधा बसवली जाणार आहे.

मुंब्रा स्थानकाबाहेर रविवारी घडलेल्या आणखी एका प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलच्या फूटबोर्डवर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी केवळ जनजागृती न करता अभियांत्रिकी उपाययोजना करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.

दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरात लोकलमधून पडून होणाऱ्या दुर्घटनांमुळे हा मार्ग प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील बनला आहे. सध्या उत्पादन सुरू असलेल्या तसेच भविष्यात मुंबई उपनगरीय सेवेत दाखल होणाऱ्या लोकलच्या नव्या रेकमध्ये स्वयंचलित दरवाजा बंद करणारी यंत्रणा कारखान्यातूनच बसवण्यात येणार आहे.

त्यामुळे गाडी सुरू झाल्यानंतर दरवाजांवर लटकून किंवा फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करण्याची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरवाजा बंद करणाऱ्या यंत्रणेने सज्ज प्राथमिक चाचणी रेक मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेत प्राधान्याने दाखल करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंब्रा आणि परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी येत्या काळात प्रत्यक्षात कितपत बदल होतो, याकडे आता प्रवासी आणि त्यांच्या संघटनांचे लक्ष लागले आहे.

जुन्या लोकलमध्येही तांत्रिक बदल

केवळ नव्या गाड्यांपुरती ही सुरक्षा व्यवस्था मर्यादित राहणार नसून, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या सेवेत असलेल्या लोकलमध्येही आवश्यक रचनात्मक बदल करण्यात येणार आहेत.

रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून जुन्या रेकमध्ये स्वयंचलित दरवाजा बंद करण्याची यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे जुन्या ताफ्यातील लोकलच्या सुरक्षेतही टप्प्याटप्प्याने सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

मुंब्र्यातील आंदोलनांना मिळाले यश

दिवा-मुंब्रा-कळवा परिसरातील प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकलमधून पडून होणाऱ्या दुर्घटनांचा मुद्दा सातत्याने रेल्वे प्रशासनासमोर मांडला. गर्दीच्या वेळी दरवाजांवर लटकून प्रवास करणारे रोजंदारी कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित करत स्वयंचलित दरवाजांची मागणी करण्यात आली होती.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रेल्वे बोर्डाने घेतलेला निर्णय हा स्थानिक प्रवाशांच्या संघर्षाची महत्त्वाची फलश्रुती मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT